कुलू : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारून अभिनेत्री वैभवी उपाध्याय घराघरात पोहोचली. वैभवीच्या निधनाची बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला. अवघ्या 32 व्या वर्षी वैभवीने कार अपघातात आपला जीव गमावला. 22 मे रोजी हिमाचल प्रदेश इथं अपघातात तिचं निधन झालं. हिमाचल प्रदेशात कुलू इथं फिरत असताना वैभवीच्या गाडीचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावरून जात असताना एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला जागा करून देण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या अगदी कडेला गाडी थांबवली होती. मात्र बाजूने जाताना ट्रकचा धक्का लागल्याने गाडी दरीत कोसळली.
अपघाताच्या वेळी गाडीत वैभवीचा होणारा पती जय सुरेश गांधीसुद्धा उपस्थित होता. जयला दुखापत झाली आणि आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं जात आहे. वैभवीच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर तिच्या अपघाताविषयी नवी माहिती समोर आली आहे. कुलू पोलिसांनी तिच्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की वैभवीचं निधन त्यावेळी झालं जेव्हा ती कारमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती.
कुलू पोलीस अधिक्षक साक्षी वर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, “वैभवीने खिडकीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी तिच्या डोक्याला मार लागला. डोक्याला लागलेला मार तिच्यासाठी घातक ठरला. बंजार सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्यासोबत कारमध्ये असलेला तिचा होणारा पतीसुद्धा जखमी झाला आहे.”
निर्माते जे. डी. मजेठिया यांनी पापाराझींशी बोलताना शोक व्यक्त केला. “हे अत्यंत दु:खद आहे. ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत हिमाचलला फिरायला गेली होती. डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. तिथे एका वळणावर त्यांनी गाडी थांबवली होती आणि तिथेच ते थांबले होते. पुढे रस्ता आणखी अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांनी वाट मोकळी करून दिली. मात्र ट्रकचाच कारला धक्का लागला आणि घाटात त्यांची कार कोसळली. वैभवीने सिटबेल्ट लावली नव्हती”, असं त्यांनी सांगितलं.
मालिकांसोबतच वैभवीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या. ‘तिमिर’ या चित्रपटातही तिने काम केलं आहे. याशिवाय सीआयडी, अदालत असा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.