Rekha | ना पती, ना मूल.. ‘या’ खास व्यक्तीला मिळणार रेखा यांची कोट्यवधींची संपत्ती
एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. अफेअरपासून लग्नापर्यंत… रेखा यांचं खासगी आयुष्य म्हणजे जणू रहस्यच आहे. त्यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दलचे किस्से आजही चवीने चघळले जातात.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. फार कमी वयात त्यांनी अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. रेखा यांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी निर्माते फार उत्सुक असायचे. आज 69 व्या वर्षी त्या महाराणीसारखं आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. रेखा यांच्या करिअरसोबतच त्यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. रेखा यांची कोट्यवधींची संपत्ती असली तरी या संपत्तीचा वारसदार कोण असेल, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. कारण त्यांना मूल नाही आणि पतीही नाही.
10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये रेखा यांचा जन्म झाला. 1966 मध्ये त्यांनी ‘रंगुला रतलाम’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर चार वर्षांनी ‘सावन भादो’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. जवळपास 50 वर्षांच्या कारकिर्दीत रेखा यांनी 190 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रेखा यांची मुंबई आणि हैदराबादमध्ये बरीच संपत्ती आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे. मात्र पती आणि मूल नसल्याने त्या आजही एकट्याच राहतात. रेखा बहुतांश वेळ त्यांच्या घरीच असतात आणि सेक्रेटरी फरझाना त्यांची पूर्ण वेळ काळजी घेतात.
View this post on Instagram
गेल्या अनेक वर्षांपासून फरझाना यांनी रेखा यांची साथ दिली आहे. त्यामुळे रेखा यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध आहेत. म्हणूनच आपल्या संपत्तीचा काही भाग त्या फरझाना यांना देणार असल्याचं म्हटलं जातं. तर संपत्तीचा आणखी काही भाग ते दान करतील. रेखा गरजू मुलं आणि वृद्धांसाठी संपत्ती दान करणार आहेत. फरझाना हे गेल्या 32 वर्षांपासून रेखा यांच्यासोबत त्यांच्याच घरी सावलीप्रमाणे राहत आहेत. रेखा यांची सर्व कामं ते स्वत: पाहतात. आजही रेखा जेव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा शूटिंगमध्ये हजेरी लावतात, तेव्हा त्यांच्यासोबत फरझाना यांना आवर्जून पाहिलं जातं.
काही दिवसांपूर्वी ‘वोग’ या मासिकेला दिलेल्या मुलाखतीत रेखा प्रेमाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर इतकं मनापासून प्रेम करता, तेव्हा ते प्रेम नाहीसं होतं का”, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रेखा पुढे म्हणाल्या, “नाही. नातं एकदा प्रस्थापित झालं की ते कायमचं असतं. कधीकधी आपल्याला त्यातून अधिक काहीतरी हवं असतं तर कधीकधी जेवढं आहे तेच पुरेसं वाटतं.”