आधी पायांना स्पर्श, नंतर मारली मिठी; रेखा – शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील जुना वाद अखेर मिटला
रेखा आणि शत्रुघ्न यांनी 70 ते 80 दशकात बऱ्याच दमदार चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यामध्ये 'रामपूर का लक्ष्मण', 'दो यार', 'कश्मकश', 'कहते है मुझको राजा', 'परमात्मा', 'जानी दुश्मन', 'मुकाबला', 'चेहरे पे चेहरा' आणि 'माटी मांगे खून' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडची ‘सदाबहार’ अभिनेत्री अर्थात रेखा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये गेल्या की तिथे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. वयाच्या 69 व्या वर्षीही त्यांचं सौंदर्य हे तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. रेखा यांचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नीसुद्धा पहायला मिळतेय. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा आणि शत्रुघ्न यांच्यात असलेले मतभेद अखेर संपुष्टात आले आहेत, हे या व्हिडीओतून स्पष्ट होतंय. मुंबईतील लेस्ली टिमिंस आणि साची नायक यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहिलं गेलं. हे क्षण पापाराझींनी कॅमेरात टिपले आहेत.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये रेखा या शत्रुघ्न यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा त्यांना मिठी मारतात. 77 वर्षीय शत्रुघ्न यांच्यासमोर रेखा यांची वागणूक पाहून चाहते खुश झाले आहेत. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी कमेंट करत रेखा यांच्या विनम्र स्वभावाचं कौतुक केलं आहे. रेखा यांनी शत्रुघ्न यांच्या पाया पडताच बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. रेखा यांना पाय स्पर्श करण्यापासून त्या रोखताना दिसत आहेत. तरीसुद्धा त्या पुढे वाकतात आणि आशीर्वाद घेतात. तेव्हा शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनमसुद्धा रेखा यांना मिठी मारतात. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हासुद्धा तिथेच उभी होती.
View this post on Instagram
रेखा आणि शत्रुघ्न यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याची चर्चा होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून या दोघांनी एकमेकांशी बातचितसुद्धा केली नव्हती. ‘खून भरी मांग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. एका क्षुल्लक गोष्टीवरून हा वाद झाल्याचं शत्रुघ्न यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटानंतर ही जोडी अधिक लोकप्रिय झाली होती.