Rhea Chakraborty | सुशांतवर काळी जादू करण्याच्या आरोपांवर रियाचं मोठं उत्तर; म्हणाली “होय..”
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रियाला सप्टेंबर 2020 मध्ये अटक केली होती. त्यानंतर तिला भायखळा तुरुंगात काही दिवस ठेवण्यात आलं होतं. जवळपास सहा आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती. हे प्रकरण अद्याप मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप झाले. सुशांतवर काळी जादू केल्याचाही आरोप रियावर करण्यात आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिया या सर्व आरोपांवर पुन्हा एकदा मोकळेपणे व्यक्त झाली. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. अवघ्या 34 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सुशांतच्या निधनापूर्वी तो रिया चक्रवर्तीला डेट करत होता. त्याच्या कुटुंबीयांनीही रियावर बरेच आरोप केले होते.
“लोकांनी मला चुडैल म्हटलेलं आवडतं”
इंडिया टुडेच्या कॉनक्लेवमध्ये रियाने हजेरी लावली होती. यावेळी तिला सुशांतवर काळी जादू केल्याच्या आरोपांवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रिया म्हणाली, “लोकांनी मला चुडैल म्हटलेलं आवडतं. हे फारच मजेशीर आहे. जुन्या काळात चुडैल कोण असायची? एक अशी स्त्री जी पुरुषप्रधान समाजासमोर झुकायची नाही आणि तिची स्वत:ची मतं कथित पुरुषांच्या आणि पुरुषप्रधान समाजाच्या विरोधात असायची. कदाचित मी तशीच महिला आहे. म्हणून कदाचित मी चुडैल आहे. कदाचित मला काळी जादू कशी करायची हे माहीत आहे.”
“दुर्दैवाने, आजही जेव्हा एखादा यशस्वी पुरुष लग्न करतो आणि त्यानंतर त्याच्या यशाला उतरती कळा लागली, तर त्याचा दोष त्याच्या पत्नीलाच दिला जातो. पहा, जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यात आली, तेव्हापासून त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं, असं म्हटलं जातं. याचा जवळपास अर्थ असाच होतो की स्त्रियांपुढे पुरुषांचं काही अस्तित्वच नाही. भारतातील बहुतांश पुरुष आजही त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडचं ऐकत नाहीत. जर त्यांनी तसं केलं तर हा समाज नक्कीच अधिक चांगला होईल. हा पुरुषप्रधान समाज आहे आणि म्हणूनच माझ्याबद्दल त्या सर्व गोष्टी बोलल्या गेल्या. जेव्हापासून ही त्याच्या आयुष्यात आली, तेव्हापासून सर्व काही झालं, असा आरोप माझ्यावर झाला”, असंही रिया पुढे म्हणाली.
रियावर आरोप
सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्याचसोबत सुशांतला ड्रग्ज खरेदी करून दिल्याच्या आरोपांचीही चौकशी करण्यात आली होती. व्हॉट्स ॲप चॅट्सच्या आधारावरून ही चौकशी सुरू झाली होती.