मुंबई- अभिनेत्री रिचा चड्ढाला तिच्या एका ट्विटमुळे जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. रिचाने भारतीय सैन्याचा अपमान केला, असा आरोप तिच्यावर होत आहे. उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर ट्विट करताना रिचाने लिहिलं, ‘गलवानने हाय म्हटलंय’. भारतीय सेना ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार आहे, असं विधान उपेंद्र द्विवेदी यांनी केलं होतं. गलवानचा उल्लेख करत रिचाने भारतीय सैनिकांचा अपमान केला, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या वादावर अखेर रिचाने जाहीर माफी मागितली आहे.
ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित रिचाने माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे गलवानचा उल्लेख कोणाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने केला नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. याचसोबत तिचे कुटुंबीय भारतीय सैन्यदलात होते, याचाही संदर्भ रिचाने या ट्विटमध्ये दिला.
‘माझा असा उद्देश कधीच नव्हता, तरीसुद्धा ज्या तीन शब्दांवरून वाद सुरू झाला आहे, त्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. कोणताही उद्देश नसतानाही जर माझ्या शब्दांनी सैन्यात असलेल्या माझ्या भावंडांच्या मनात अशी भावना निर्माण होत असेल तर मला खूप दु:ख होईल.’
‘सैन्यात माझ्या आजोबांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. लेफ्टनंट कर्नल असताना 1960 मधल्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागली होती. माझे मामाजी पॅराट्रूपर होते. हे माझ्या रक्तात आहे.’
‘जेव्हा एखादा मुलगा देशाच्या सुरक्षेसाठी शहीद किंवा जखमी होतो तेव्हा संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. मी जवळून हे दु:ख पाहिलंय आणि अनुभवलंय. माझ्यासाठी हा खूप भावूक मुद्दा आहे’, अशी पोस्ट रिचाने लिहिली.
@BediSaveena pic.twitter.com/EYHeS75AjS
— RichaChadha (@RichaChadha) November 24, 2022
भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली रिचाने उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘गलवान संघर्षात देशाच्या 20 शूर सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. मात्र इथे एक अभिनेत्री भारतीय सेनेची मस्करी करतेय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रिचावर टीका केली.
2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवानमध्ये चकमक झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे जवळपास 35-40 सैनिक मारले गेले होते. या संघर्षानंतर भारत आणि चीनदरम्यान अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.