Richa Chadha: रिचा चड्ढाकडून भारतीय सेनेचा अपमान; ट्विटरवर संताप व्यक्त
गलवानचा उल्लेख करत रिचा चड्ढाने भारतीय सेनेची उडवली खिल्ली; भडकले नेटकरी
मुंबई: अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक असं ट्विट केलंय, ज्यामुळे तिच्यावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका विधानावर तिने हे ट्विट केलंय. भारतीय सेना ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार आहे, असं ते मंगळवारी म्हणाले. त्यांचं हेच विधान शेअर करत रिचाने ‘गलवानने हाय म्हटलंय’ असं ट्विट केलंय.
रिचाने गलवानसंदर्भात अशा पद्धतीचं ट्विट करून भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. भारतीय लष्कराबद्दलचं हे अत्यंत अपमानकारक ट्विट असल्याचं म्हणत अनेकांनी रिचावर राग व्यक्त केला आहे.
‘गलवान संघर्षात देशाच्या 20 शूर सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. मात्र इथे एक अभिनेत्री भारतीय सेनेची मस्करी करतेय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रिचावर टीका केली. ‘जवानों का मजाक उडाने वालों को यह देश और कुदरत कभी माफ नहीं करेगा’, असं ट्विट दिग्गज निर्माते अशोक पंडित यांनी केलंय. तर ‘रिचासारखी अशिक्षित अभिनेत्री बॉलिवूडमध्ये का आहे’, असा उपरोधिक सवालही संतापलेल्या नेटकऱ्यांनी केला आहे.
रिचा चड्ढाचं ट्विट-
Galwan says hi . https://t.co/agoXrJxFpW
— RichaChadha (@RichaChadha) November 23, 2022
2020 मध्ये झाला होता गलवान संघर्ष
2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवानमध्ये चकमक झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे जवळपास 35-40 सैनिक मारले गेले होते. या संघर्षानंतर भारत आणि चीनदरम्यान अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.
15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय झालं?
गलवान नदी किनाऱ्यावर भारताच्या हद्दीत चिनी सैन्यांचा एक तंबू होता. बैठकीत चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तो तंबू हटवण्याचा शब्द दिला. या बैठकीदरम्यान 16 बिहार बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांनीदेखील चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर चिनी सैन्याने तो तंबू नष्टदेखील केला. मात्र, 14 जूनच्या मध्यरात्री चिनी सैनिकांकडून त्याच जागेवर पुन्हा तंबू उभारण्यात आला.
चिनी सैन्याच्या या वागणुकीवरुन 16 बिहार रेजिमेंटमध्ये नाराजी होती. चिनी सैनिकांच्या या वर्तवणुकीचा बटालयिनमधील काही तरुण जवानांना राग आला होता. चिनी सैनिकांचा हा तंबू उद्धवस्त करुन टाकावा, असं अनेकाचं मत होतं. मात्र, कर्नल संतोष बाबू यांचा विचार वेगळा होता. या विषयाला संयम आणि शांततेने हाताळावं, अशी त्यांची इच्छा होती.
15 जून रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्यासह 35 जवानांची टीम पायी चिनी सैन्याच्या तंबूजवळ पोहोचली. तेव्हा त्यांची वागणूक, हावभाव बदलले होते, हे भारतीय सैनिकांच्या लक्षात आलं. याशिवाय या भागात नेहमी तैनात असलेले चिनी सैनिक तिथे नव्हते. चीनने तिथे नव्या सैनिकांना पाठवलं होतं.
जेव्हा कर्नल संतोष बाबू यांनी या भागात पुन्हा तंबू का बनवला? असा प्रश्न विचारला तेव्हा एका चिनी सैन्याने पुढे येत कर्नल संतोष बाबू यांना जोराचा धक्का दिला. यावेळी त्या सैनिकाने चिनी भाषेत अपशब्दांचादेखील प्रयोग केला. त्यानंतर गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. भारतीय सैनिकांच्या प्रतिहल्ल्यात मोठ्याप्रमाणावर चिनी सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनने मृत सैनिकांचा आकडा कधीच जगासमोर जाहीर केला नाही.