शुभमन गिलसोबतच्या नात्यावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या कुटुंबीयांना..”
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहेत. या चर्चांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. पापाराझी वीरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत ती यावर स्पष्टच बोलली आहे.
भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर शुभमन गिल त्याच्या दमदार खेळीसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. कधी अभिनेत्री सारा अली खान तर कधी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. यात आता आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित. ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रिद्धिमा ही शुभमनला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं गेलंय. या सर्व चर्चांवर रिद्धिमाने याआधीही दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. मात्र तरीही या चर्चा न थांबल्याने तिने पुन्हा एकदा मौन सोडलं आहे.
पापाराझी विरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा म्हणाली, “याबद्दल आता मी काय बोलावं हेच मला कळत नाही. हा विषय संपायचं नावंच घेत नाहीये. कदाचित लोकांना मी आणि शुभमन गिल एकत्र येण्याची कल्पना आवडत असावी. पण खरं सांगायचं झालं तर मी कधी त्याला भेटलेसुद्धा नाही. माझ्या सर्व शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. पण या अफवा कुठून पसरवल्या जात आहेत, हेच मला कळत नाही.”
View this post on Instagram
“गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आमच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र आमच्यात असं काहीच नाही. मी चाहत्यांचं मन मोडल्याबद्दल माफी मागते. पण शुभमन गिल आणि माझ्यात असं कोणतंच नातं नाही. कारण मी त्याला ओळखतच नाही. कदाचित माझ्या चाहत्यांना ही गोष्ट आवडत असावी की रिद्धिमाला तिचा पार्टनर भेटला. मग तो क्रिकेटर असो किंवा एखादी सामान्य व्यक्ती. माझ्या चाहत्यांना यातच रस असावा की अखेर मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटला. शुभमनचं नाव इतरही काही सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलंय. यावर त्याने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. पण मला आता त्या चर्चांवर बोलावं लागतंय. कारण माझ्या कुटुंबीयांना याबद्दल खूप फोन येत आहेत. काहींनी तर या चर्चांमुळे मला जी प्रसिद्धी मिळतेय, त्याला एंजॉय करण्याचाही सल्ला दिला आहे. पण मला त्याचीही गरज नाही. कारण मी काम करून माझं नाव कमावलंय. मी माझ्या कामामुळे ओळखली जावी, अशी माझी इच्छा आहे”, असं रिद्धिमाने स्पष्ट केलं.