जावई कसा हवा? रिंकू राजगुरूच्या वडिलांचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
'सैराट' या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारत अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली. या चित्रपटानंतर रिंकूच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू आणि तिचे वडील लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने बघता बघता मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘सैराट’नंतर रिंकूने हाती येईल ते काम स्वीकारण्यापेक्षा मोजक्या पण चांगल्या स्क्रिप्टना प्राधान्य देण्याचं ठरवलं. शिक्षणासोबतच अभिनयातील करिअर सांभाळून तिने आजही लोकप्रियता कायम ठेवली. ‘सैराट’नंतर रिंकूविषयी प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळाली. आजसुद्धा तिच्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू आणि तिचे वडील विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. या मुलाखतीत आपल्याला जावई कसा हवाय, याचाही खुलासा रिंकूच्या वडिलांनी केला आहे.
‘फादर्स डे’निमित्त रिंकू आणि तिच्या वडिलांनी ‘राजश्री मराठी’ला ही मुलाखत दिली. या मुलाखतीत मुलीच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता, “ती ठरवेल ते चालेल, पण तिने सांगितल्यावर आम्ही निर्णय घेऊ”, असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं. वडिलांच्या तोंडून हे उत्तर ऐकल्यानंतर रिंकूनेही त्यांना विचारलं, “मला एखादा मुलगा आवडतो म्हटल्यावर तुम्ही त्याच्याशी लग्नासाठी होकार द्याल का?” लेकीच्या या प्रश्नावर महादेव राजगुरू यांनी असं उत्तर दिलं, जे आता प्रत्येकालाच आवडतंय.
ते म्हणाले, “आम्ही तिला जसं स्वातंत्र्य दिलंय, तसं त्यानेही तिला द्यावं. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको.. अशी बंधनं त्याने आणू नयेत. हे क्षेत्रच असं आहे की तिला विविध ठिकाणी जावंच लागतं. या क्षेत्रातील गोष्टी ज्याला कळू शकतील, तोच तिला समजून घेऊ शकतो. जर मुलात हे गुण असतील तर आमची काहीच हरकत नाही.”
View this post on Instagram
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्य पूर्णपणे पालटलं. रिंकू 15 वर्षांची असताना या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 17 वर्षांची असताना रिंकूला तिच्या वाढत्या प्रसिद्धीपेक्षा अधिक चिंता परीक्षेच्या निकालाची होती. रिंकूचा हाच साधेपणा अनेकांना आजही भावतो. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या बऱ्याच मुलाखती झाल्या. या मुलाखतींमध्ये रिंकूचा साधा आणि तितकाच थेट स्वभाव पहायला मिळाला.