Kantara: ‘कांतारा’ ऑस्करच्या शर्यतीत; प्रॉडक्शन हाऊसने दिली मोठी बातमी
ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' ऑस्कर मिळवणार? प्रॉडक्शन हाऊसने उचललं मोठं पाऊल
मुंबई: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांनी त्याचं इतर भाषांमध्ये डबिंग केलं. कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही या चित्रपटाने जोरदार कमाई केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची वाहवा झाली. आता कांतारा या चित्रपटाला ऑस्कर या प्रतिष्ठित पुरस्काराच्या नामांकनासाठी पाठवलं गेलं आहे. ऑस्कर नॉमिनेशनसाठी निर्मात्यांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. होमेबल प्रॉडक्शन्सचे संस्थापक विजय किरगंदुर यांनी ही माहिती दिली.
ऑस्करच्या शर्यतीत कांतारा
एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाले, “आम्ही कांतारासाठी ऑस्करमध्ये अर्ज दाखल केला आहे. अद्याप नॉमिनेशन फायनल झालेलं नाही. कांतारा त्याच्या दमदार कथेच्या जोरावर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल असा आम्हाला विश्वास आहे.”
अवघ्या 16 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांतारा’ने जगभरात तब्बल 400 कोटींची कमाई केली. थिएटरमध्ये धुमाकूळ माजवल्यानंतर ‘कांतारा’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे एक नव्हे तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे हक्क विकले गेले आहेत.
कांतारा 2 येणार?
कांताराचं हे यश पाहता निर्माते त्याच्या सीक्वेलचाही विचार करत आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाले, “ऋषभ सध्या कामानिमित्त देशाबाहेर आहे. तो जेव्हा परतेल, तेव्हा आम्ही त्याच्यासोबत सीक्वेलच्या कथेबाबत चर्चा करणार आहोत. आमच्याकडे कांतारा 2 चा प्लॅन आहे, मात्र सध्या त्याचा कोणताच टाइमलाइन नाही.”
कांताराचा अर्थ काय?
‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे.