Ved: रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटात मोठे बदल; ‘या’ दिवसापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवं व्हर्जन
रितेश-जिनिलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात अशी गोष्ट पहिल्यांदाच 'वेड' चित्रपटामुळे घडून येणार आहे.
मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा लवकरच 50 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे पोहोचणार आहे. वेडची कथा, गाणी, संवाद प्रेक्षकांना भावलं आहे. रितेश-जिनिलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच वेड चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात अशी गोष्ट पहिल्यांदाच ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे.
एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यात कधीच कुणी एखादं गाणं नव्याने समाविष्य केलं नव्हतं. मराठीच नव्हे तर बॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्येही असं घडलं नवह्तं. पण ‘वेड’ चित्रपटात आता सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनिलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझं’ या गाण्याचं नवीन व्हर्जन समाविष्ट करण्यात येणार आहे. यासोबतच तीन नवे सीन्सही चित्रित करून त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
‘वेड’चं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिएटरमध्ये येत्या 20 जानेवारीपासून पहायला मिळणार आहे. वेड चित्रपटाच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलिया हे दोघं अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा त्यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. चित्रपटात आधी ‘वेड तुझं’ हे गाणं रितेश आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली.
View this post on Instagram
‘वेड’ने मोडला ‘सैराट’चा विक्रम
‘वेड’चं केवळ प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकच झालं नाही, तर बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 44.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलिया देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. मूळ तेलुगू चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.