Ved: अक्षय, अजयसह ‘या’ 10 स्टार्सवर भारी पडला रितेश देशमुखचा ‘वेड’; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केली.
मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘वेड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू आहे. एकीकडे बॉलिवूड विरुद्ध साऊथच्या चित्रपटांचा वाद सुरू असताना आता मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 47.66 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘वेड’मध्ये रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलिया डिसूझाचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केली.
‘वेड’ची तिसऱ्या वीकेंडची कमाई-
शुक्रवार- 1.35 कोटी रुपये शनिवार- 2.72 कोटी रुपये रविवार- 2.74 कोटी रुपये एकूण- 47.66 कोटी रुपये
#Marathi film #Ved puts up an EXCELLENT number in Weekend 3 [₹ 6.81 cr]… Will cross ₹ 50 cr on weekdays… Should have a clear, unopposed run till #Pathaan arrives… [Week 3] Fri 1.35 cr, Sat 2.72 cr, Sun 2.74 cr. Total: ₹ 47.66 cr. pic.twitter.com/9YiaSPw3Xp
— taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2023
बॉलिवूडच्या 10 सेलिब्रिटींच्या चित्रपटांना टाकलं मागे
आनंद एल राय दिग्दर्शित अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ‘वेड’पेक्षाही कमी होतं. अक्षयच्या या चित्रपटाने जवळपास 44.39 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटाचा बजेट सुमारे 70 कोटी रुपये होता.
शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारच कमी होतं. 22 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त 19.68 कोटी रुपये कमावले होते.
सूरज बडजात्या दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाचीही कमाई ‘वेड’पेक्षा कमी होती. ‘उंचाई’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 34.15 कोटी रुपये इतकं होतं.
रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला. डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त 35.50 कोटी रुपये कमावले होते.
रितेशच्या ‘वेड’ने आयुषमान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’, राजकुमार रावच्या ‘बधाई दो’, सनी देओलच्या ‘चुप’, टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’, अर्जुन कपूरच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ या चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.