‘बिग बॉस मराठी 5’चा होस्ट म्हणून फुसका.. रितेश देशमुखवर का वैतागले प्रेक्षक?
'बिग बॉस मराठी 5'चा चांगला टीआरपी मिळत असला तरी 'भाऊचा धक्का' एपिसोड पाहून प्रेक्षक वैतागले आहेत. नेटकऱ्यांनी सूत्रसंचालक रितेश देशमुखवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. रितेश होस्ट म्हणून फुसका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 16 स्पर्धक या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आणि त्यापैकी तिघांनी बिग बॉसच्या घराला रामरामसुद्धा केला. पहिल्या चार सिझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत होते. मात्र यंदाच्या सिझनसाठी अभिनेता रितेश देशमुखची सूत्रसंचालक म्हणून निवड करण्यात आली. टास्कदरम्यान आणि त्यानंतरही स्पर्धकांमध्ये अनेक वाद होताना पहायला मिळत आहेत. तर आठवड्याअखेर ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेश त्यांची शाळा घेतो. ‘बिग बॉस मराठी 5’चा टीआरपीसुद्धा चांगला असल्याचं कळतंय. मात्र अशातच नेटकऱ्यांनी रितेशवर नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका प्रोमोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेशवर टीका केली आहे.
‘जान्हवीने सूरजला शिव्या दिल्या, त्या म्युट केल्या. मग भाऊच्या धक्क्यावर त्यावर का बोललं गेलं नाही? कुठे गेला तुमचा फेअर शो, कुठे गेली तुमची लॉयल्टी’, असं एकाने लिहिलंय. तर ‘रितेश देशमुख होस्ट म्हणून अगदीच फुसका वाटतो’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘एवढा चांगला टीआरपी मिळाला आहे, पण वीकेंडच्या डावाला कंटाळा येतो’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘रितेश सर.. थोडं बोला ना अजून. सारख काय महाराष्ट्र-महाराष्ट्र करता, पुढे पण बोला ना. खूप मुद्दे आहेत पण तुम्ही त्यावर बोलतच नाही. तिकडे कोणाला सॉफ्ट कॉर्नर देताय’, अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
रितेश देशमुखवर बरेच प्रेक्षक नाराज असल्याचं या कमेंट्सवरून दिसून येत आहे. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये काही स्पर्धकांना मुद्दाम काही बोललं जात नाही, अशी टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काहींनी महेश मांजरेकर यांना परत आणा, अशीही मागणी केली आहे.
महेश मांजरेकर यांनी का सोडला शो?
“पुढील दोन ते तीन महिने मी या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणार आहे. माझ्या मनातही काही कल्पना आहेत. त्यामुळे हे शूटिंग संपल्यानंतर त्यावर मी काम करणार आहे. म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही”, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं होतं. “मी जेव्हा बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालनाला सुरुवात केली होती, तेव्हा माझा फक्त वर्षभराचाच करार होता. त्याआधी मी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. पण जेव्हा करार केला, तेव्हा शोचे काही एपिसोड्स पाहिले आणि हा गेम भारी आहे, असं वाटलं. सूत्रसंचालनाला सुरुवात केली आणि असे एकाचे चार सिझन्स झाले. पण पाचव्या सिझनच्या वेळी त्यांना खरंच असं वाटलं असेल की मी जरा रिपिटेटिव्ह होतोय. त्यांना जे अपेक्षित असेल ते कदाचित माझ्याकडून येत नसेल,” असंही ते एका मुलाखतीत म्हणाले होते.