कॅलिफोर्निया: जेव्हा खऱ्या प्रेमाचं उदाहरण दिलं जातं, तेव्हा हीर-रांझा, लैला-मजनू आणि रोमियो अँड ज्युलिएट यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. या प्रेमी-युगुलांवर आजवर बरेच चित्रपट बनवले गेले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘रोमियो अँड ज्युलिएट’. हॉलिवूड दिग्दर्शक फ्रँको जेफेरीली आणि पॅरामाऊंट पिक्चर्स यांनी 1968 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यावेळी हा चित्रपट यशस्वी ठरला होता. मात्र आता तब्बल 55 वर्षांनंतर यातील मुख्य कलाकारांनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर खटला दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी 50 कोटीहून अधिक डॉलर्सची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
रोमियो अँड ज्युलिएट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऑलिविया हसी आणि लिओनार्ड व्हायटिंग यांनी चित्रपटात फसवणूक करून न्यूड सीन शूट करवून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी दोघांचं वय 15 आणि 16 वर्षांचं होतं. आता दोघांचं वय 71 आणि 72 वर्षे आहे. या दोन्ही कलाकारांनी सँटा मोनिका सुपीरिअर कोर्टात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोप करत दिग्दर्शक फ्रँको जेफेरीली आणि निर्माते पॅरामाऊंट पिक्चर्स यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे.
विशेष म्हणजे रोमियो अँड ज्युलिएट या चित्रपटाचे दिग्दर्शक जेफेरिली यांचं 2019 मध्ये निधन झालं. बेडरुम सीनदरम्यान कोणतीच न्युडिटी नसणार असं आश्वासन त्यांनी दिल्याचं मुख्य कलाकारांनी म्हटलंय. स्कीन कलरचे अंतर्वस्त्र घालून हे सीन शूट करण्यात येणार असल्याचं त्यांनी कलाकारांना म्हटलं होतं. मात्र शूटिंगच्या दिवशी कलाकारांना फक्त बॉडी मेकअप करण्यात आला होता. असं न केल्यास चित्रपट हिट ठरणार नाही, असं म्हणत दिग्दर्शकांनी आमच्याकडून ते शूट करून घेतलं, असा आरोप आता मुख्य कलाकारांनी केला आहे.
बेडरुम सीनच्या शूटिंगदरम्यान कॅमेरे अशा पद्धतीने लावले जातील की चित्रपटात कोणतीही न्युडिटी दिसणार नाही, असं आश्वासन दिग्दर्शकांनी ऑलिविया आणि लिओनार्ड यांना दिलं होतं. आपल्या नकळत आपली फसवणूक करत चित्रपटासाठी न्यूड सीन शूट करून घेतल्याचा आरोप त्यांनी खटल्यात केला आहे.
ऑलिविया आणि लियोनार्ड यांनी तब्बल 500 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ऑलिवियाने या न्यूड सीनचं समर्थन केलं होतं. “माझ्या वयाच्या कोणत्याच अभिनेत्रीने ते याआधी केलं नव्हतं. तो सीन कथेची गरज होती आणि दिग्दर्शक जेफेरिली यांनी सर्व गोष्टींचा विचार करून त्याचं शूटिंग केलं होतं”, असं ती म्हणाली होती.
2018 मध्ये दिलेल्या आणखी एका मुलाखतीत ऑलिविया म्हणाली होती, “चित्रपटातील बेडरूम सीन हा त्यावेळी अमेरिकेत निषिद्ध होता, मात्र युरोपियन चित्रपटांमध्ये त्यावेळी ही सर्वसामान्य बाब होती. ती काही एवढी मोठी गोष्ट नव्हती.”