RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात डंका; रचला नवा विक्रम
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या RRR ची धूम; 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार
Golden Globe Awards 2023: लॉस एंजिलिसमध्ये 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचा डंका पहायला मिळाला. RRR मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. या पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी हजेरी लावली.
भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. RRR या चित्रपटाला दोन विभागांमध्ये नॉमिनेशन मिळालं. नॉन इंग्लिश लँग्वेज आणि बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर या दोन विभागांमध्ये RRR ला नामांकन मिळालं होतं.
‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
INDIAAAAAAAA…. THIS IS THE BEST NEWS to WAKE UP TO!! ??????#NaatuNaatu becomes the first ever Asian song to win a #GoldenGlobes . ??? #RRRMovie pic.twitter.com/LXHZqhmNaY
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
RRR हा चित्रपट प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. भारताकडून पाठवण्यात आलेल्या पाच चित्रपटांमध्ये याचा समावेश आहे. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.