ईदच्या शुभेच्छा दिल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; म्हणाली ‘धर्म पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी..’
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिला सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा देणं महागात पडलं आहे. रुचिराच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून तिला ट्रोल केलंय. या ट्रोलिंगवर रुचिराने उत्तर दिलं आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती चाहत्यांसाठी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच तिने तिच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमुळे रुचिराला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. रुचिराने बहरीनमधल्या शूटिंगचे फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरूनच अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सणाच्या दिवशी कोणत्या मुस्लिम महिलेनं साडी नेसून, कपाळाला टिकली लावून तुम्हाला शुभेच्छा दिल्या का कधी? मग तुम्हाला का पुळका एवढा?,’ असा सवाल नेटकऱ्यांनी रुचिराला केला. त्यावर तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
रुचिरा जाधवचं ट्रोलर्सना उत्तर-
ट्रोलर्सच्या कमेंटवर उत्तर देत तिने लिहिलं, ‘इतका द्वेष पाहून मला धक्का बसला आणि मी चकीत झाले आहे. या फोटोंमध्ये मी कुर्ती, डेनिम, स्कार्फ आणि गॉगल अशा पोशाखात दिसतेय. हा माझा पोशाखच आहे. मी जे करतेय ते माझं काम आहे. कॅमेरासमोर ‘अभिनय’ करणं. कर्म आणि धर्म ‘पूर्णपणे’ समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट. बाकीचे.. मला खरंच माहीत नाही की तुम्हा सर्वांना काय म्हणावं. महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय, ‘महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवलं?’
‘जे लोक माझ्या ‘बायो’वरून प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांना सांगू इच्छिते की ‘गीतेतला कर्मयोग समजला असता, तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती.’ तुमच्या भावनांचा आदर आहेच. पण याचा अर्थ असा नाही की तुमचा दृष्टीकोन नेहमीच योग्य असेल. हरे कृष्ण. ता. क.- मला माहितीये की मी काय करतेय,’ अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. त्याचसोबत या पोस्टच्या अखेरीस तिने शहाणे आंधळे नसतात अशा अर्थाचा हॅशटॅग जोडला आहे.
‘पण का? ईद मुबारक वगैरे कशाला? मराठी सण आहेत एवढे, मग हे कशाला,’ असा सवाल एका युजरने केला. तर ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला धर्म सोडून मशिदीमधे जाऊन नमाज अदा करा असं कुठे लिहीलं होत का? स्वतःचं खरं करायला काहीही लिहायचं? आदर करणं वेगळं आणि हे तुम्ही केलात ते वेगळं,’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली. अनेकांनी रुचिराला अनफॉलो करा, अशाही कमेंट्स लिहिल्या आहेत.