‘अशा लोकांचा, वृत्तीचा हेतू तपासला पाहिजे..’; ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील लेझीमच्या नृत्याच्या सीनवरून वाद निर्माण झाला. या वादानंतर दिग्दर्शकांनी तो सीन हटवणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर आता एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. या प्रसंगावर संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. तसंच उदयनराजे भोसले यांनीही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल, असं सांगितलं होतं. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंद काढला जाणार असल्याचं उतेकर यांनी स्पष्ट केलं. यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. ‘माझ्या राजाला नवीन रुपात बघायला मला आवडलं असतं’, असं तिने म्हटलंय. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘ओह.. मला आवडलं असतं, माझ्या राजाला नवीन रुपात बघायला. ज्याने स्वत:च्या कारकिर्दीत एवढं सगळं झेललं, त्याचा त्याला आनंद ‘परंपरा जपत’ साजरं करताना बघायला. सिनेमा ही एक कला आहे. मुळात असे दृश्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर या अशा लोकांचा आणि वृत्तीचा हेतू तपासला पाहिजे.’




‘छावा’ हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीचे अधिकृतरित्या हक्क घेऊन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. याविषयी दिग्दर्शक उतेकर म्हणाले, “या कादंबरीत लिहिलंय की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. तसंच लेझीम हा आपला पारंपरिक नृत्यप्रकार असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्सव साजरा करताना लेझीम नृत्य केलं असल्याचा विचार आपसूकच मनात आला. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या लेझीम नृत्याचा प्रसंग दाखवून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. लेझीम नृत्यांचा प्रसंग महाराजांपेक्षा मोठा नाही, त्यामुळे आम्ही निश्चितच हा प्रसंग चित्रपटातून वगळणार आहोत.”