Manali Flood |मनालीच्या भीषण पुरात अडकला अभिनेता, रिसॉर्टमध्ये शिरलं पाणी; गावाच्या शाळेत शोधला निवारा
रुसलानने पुढे सांगितलं की मनालीमधली परिस्थिती भयावह आहे. मात्र हळूहळू त्यात सुधारणा होत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला तर रस्ते चालू केले जाऊ शकतील. मात्र मुंबईला परतायला आणखी काही दिवस जातील, कारण भूस्लखनामुळे काही रस्ते खराब झाले आहेत.
मनाली : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली या राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. अभिनेता रुसलान मुमताज हिमाचल प्रदेशमधील मनालीत अडकला आहे. 4 जुलै रोजी तो त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगनिमित्त मनालीला गेला होता. मात्र सततचा पाऊस, भूस्खलन यांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने त्याला तिथून परत येता आलं नाही. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर तिथले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत आहे. सध्या तो मनालीतील एका छोट्याशा गावातील शाळेत थांबला आहे.
रुसलानने सांगितलं की जेव्हा तो 4 जुलै रोजी मनालीला शूटिंगसाठी गेला होता तेव्हा तो तिथल्या एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. तिथेच त्याच्या सीरिजची शूटिंग सुरू होती. मात्र 9 जुलैपासून तिथली परिस्थिती बिघडू लागली. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मनालीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि रिसॉर्टच्या आत पाणी शिरलं. रुसलानने सांगितलं, “आम्हाला रिसॉर्टच्या सर्व्हिस क्वॉर्टरमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे आम्ही सुरक्षित होतो. मात्र दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं की ती जागासुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळे रिसॉर्टच्या स्टाफने आम्हाला डोंगरावरील एका छोट्याशा गावात नेलं. आता आम्ही इथे सुरक्षित आहोत. मात्र चिंतेची बाब अशी आहे की आम्ही इथल्या एका गावातील शाळेत थांबलो आहोत. ही जागा थोडी वर असल्याने इथे खाण्या-पिण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ही वेळ अत्यंत कठीण आहे पण रिसॉर्टच्या मालकाने आम्हाला एकटं सोडलं नाही. ते आम्हा सर्वांची काळजी घेत आहे.”
View this post on Instagram
रुसलानने पुढे सांगितलं की मनालीमधली परिस्थिती भयावह आहे. मात्र हळूहळू त्यात सुधारणा होत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला तर रस्ते चालू केले जाऊ शकतील. मात्र मुंबईला परतायला आणखी काही दिवस जातील, कारण भूस्लखनामुळे काही रस्ते खराब झाले आहेत.
रुसलान हा अभिनेत्री अंजना मुमताज यांचा मुलगा आहे. 2007 मध्ये त्याने ‘मेरा पहला पहला प्यार’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. याशिवाय त्याने बालिका वधू, लाल इश्क, एक विवाह ऐसा भी आणि काही वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रुसलानने शेअर केलेल्या इतर काही व्हिडीओमध्ये मनालीतील पूरपरिस्थिची भयाण दृश्ये पहायला मिळत आहेत. त्याचे हे व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या 50 वर्षांत यंदा प्रथमच सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे.