मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झालेली प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची पहिली ओळख आता साखरपुड्यापर्यंत पोहोचली आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. आता दोघांनी त्यांच्या नात्याला खास वळण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत विश्वात स्वतःची भक्कम अशी ओळख निर्माण केली. काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धा यांनी ‘आमचं ठरलं..’ असं कॅप्शन देत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. आता दोघांनी साखरपुडा देखील केला आहे. चाहते आता प्रथमेश आणि मुग्धा यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.
इन्स्टाग्रामवर प्रथमेश आणि मुग्धा यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘वाङ्निश्चय…’ असं लिहिलं आहे. अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीत प्रथमेश आणि मुग्धा यांचा साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि चहते देखील प्रथमेश – मुग्धा यांनी नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
फोटोमध्ये मुग्धा कोशरी रंगाच्या कॉटनच्या साडीत दिसत आहे. गळ्यात साधा हार आणि हतात कड्यामुळे मुग्धा हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तर, प्रथमेशचा सदरा, डोक्यावर टोपी दोघांच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रथमेश – मुग्धा यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगलेली आहे.
सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेल्या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल देखील एका मुलाखतीत दोघांनी सांगितलं.
एकदा कार्यक्रमाची तालीम सुरु असताना दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं. प्रथमेश कधी ना कधी प्रपोज करणार, याची जाणीव मुग्धाला होती आणि मुग्धा होकार याची खात्री प्रथमेश याला होती. पण तरी देखील मुग्धा हिने होकार द्यायला तीन-चार दिवसांचा अवधी घेतला.
अखेर एकेदिवशी मुग्धा हिने प्रथमेश याला भेटायला बोलावलं आणि आपलं उत्तर होकारार्थी असल्याचं सांगितलं. जवळपास गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत आहेत. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. अखेर ठरवून दोघांनी एकाच वेळी आपापल्या कुटुंबीयांना सांगितलं. आता मुग्धा आणि प्रथमेश कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.