सततच्या ट्रोलिंगबद्दल हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाली “आयुष्यात निराश..”
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र हृतिकची गर्लफ्रेंड असल्याने सबाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सबाने ट्रोलिंगविषयी आपलं मत मांडलं आहे.

अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांकडून नकारात्मक टिप्पण्या होतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सबा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सुझान खानला घटस्फोट दिल्यानंतर 2022 पासून हृतिक सबाला डेट करतोय. सबा ही हृतिकपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे वयातील अंतरावरून अनेकदा त्यांच्यावर टीका होते.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत सबा म्हणाली, “मी सोशल मीडिया वापरण्याबाबत खूप वाईट आहे. मी सलग तीन दिवस पोस्ट करेन आणि त्यानंतर महिनाभरासाठी गायब होईन. परफॉर्मिंग कलाकारांसाठी हा जणू एक पोर्टफोलियोच बनला आहे. तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना.. अशा प्रकारचं हे नातं आहे. ब्रँड्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करण्याचं हे एक साधन आहे. त्याव्यतिरिक्त लोकसंख्येचा असंतोष वाढत असताना अशा प्रकारचं नकारात्मक वर्तनदेखील ऑनलाइन वाढू लागलंय. जर तुम्ही आनंदी व्यक्ती असाल, तर तुम्ही फेक (बनावट) अकाऊंट्स बनवून लोकांना ट्रोल करणार नाही. त्यामुळे चेहरा नसलेल्या, नाव नसलेल्या आणि आयुष्यात निराश असलेल्या अशा लोकांबद्दल मी का काळजी करू?”




View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “ट्रोलिंगबद्दल राग व्यक्त करण्यापेक्षा मी त्याकडे दुसऱ्या नजरेतून पाहते. तुम्हाला हे करावं लागतंय, याचं मला वाईट वाटतं.. असं मी ट्रोलर्सबद्दल विचार करते. सुरुवातीला मला वाटायचं की जर मी माझं काम करतेय, तर तुम्हाला काय समस्या आहे? पण हळूहळू मला समजू लागलं की ट्रोलिंगविषयी विचार करणयात वेळ घालवण्याइतकं ते महत्त्वाचं नाही. आता मी जाड चामडीची झाली आहे. जरी याबद्दल मी मौन बाळगत असले तरी कधी कधी मलाही उत्तर द्यावंसं वाटतं. तुम्ही सतत माझ्यावर टीका करणार आणि मी शांतपणे ऐकून घेणार.. असं नेहमीच होणार नाही. अशी लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, याची मला आता चिंता नाही.”
हृतिक रोशनने लग्नाच्या 14 वर्षांनंतर सुझान खानला घटस्फोट दिला. बॉलिवूडमधील हा सर्वांत चर्चेतला आणि महागडा घटस्फोट ठरला होता. विभक्त झाल्यानंतर हृतिक आणि सुझान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही पुढे गेले आहेत. एकीकडे हृतिक सबाला डेट करतोय. तर सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. इतकंच नव्हे तर या चौघांमध्येही चांगली मैत्री आहे.