Sachin Tendulkar | अभिनेत्रीची बॉलिंग पाहून सचिन तेंडुलकर अवाक्; म्हणाला “असा शॉट कधीच खेळलो नाही”
आर. बाल्की दिग्दर्शित 'घूमर' या चित्रपटात अभिषेक आणि सैयामीसोबतच अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. याआधी क्रिकेटर वीरेंदर सेहवाग आणि क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनीसुद्धा या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं.
मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा ‘घूमर’ हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. केवळ प्रेक्षकांनाच नाही तर क्रिकेट विश्वातील दिग्गजांनाही हा चित्रपट पसंतीस पडत आहे. रविवारी या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्क्रिनिंगला क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सैयामी खेरसोबत फोटोसाठी पोझ दिला. सैयामीने यामध्ये दिव्यांग खेळाडूची भूमिका साकारली आहे. सचिन तेंडुलकर तिच्या अभिनयाने तर प्रभावित झालाच, पण तिची बॉलिंग पाहून तो थक्क झाला. सैयामीने सचिनसमोर बॉलिंग करून दाखवली आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चित्रपटात सैयामीचा एक हात अधू असतो. त्यामुळे ती एकाच हाताने क्रिकेट खेळते. जेव्हा सचिनने तिची भेट घेतली, तेव्हा त्याने त्याच्यासमोर बॉलिंग करून दाखवण्यास सांगितलं. त्यावर सैयामी म्हणते, “मी चित्रपटात बॉलिंग केली, मात्र आता तुमच्यासमोर करताना माझ्यावर खूप दबाव असेल.” त्यानंतर ती एक हात मागे घेऊन डाव्या हाताने बॉलिंग करून दाखवते. हे पाहून सचिनसुद्धा थक्क होतो आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवतो. “मी असा शॉट कधीच खेळलो नाही”, असं तो म्हणतो. या व्हिडीओच्या अखेरीस सचिन पुन्हा एकदा सैयामीचं कौतुक करतो. “चित्रपटातील भूमिकेसाठी ती जवळपास एक वर्ष हात मागे किंवा पुढे दुमडून ठेवून वावरत होती. तुम्ही असं थोडा वेळ करून पहा. खूप वेदना होतील”, असं तो म्हणतो.
View this post on Instagram
आर. बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ या चित्रपटात अभिषेक आणि सैयामीसोबतच अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. याआधी क्रिकेटर वीरेंदर सेहवाग आणि क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनीसुद्धा या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. ‘घूमर हा चित्रपट खूपच चांगला आहे. क्रिकेट, प्रेरणा आणि भावना या चित्रपटात भरभरून आहेत. आपले अश्रू थिएटरमध्ये घेऊन जा’, असं ट्विट सेहवागने केलं होतं.