अक्षय कुमारचा OMG 2 पाहिल्यानंतर सदगुरूंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “तरुणांच्या शारीरिक गरजा..”
2012 मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 'ओह माय गॉड' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. यामध्ये अक्षयसोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 3 ऑगस्ट रोजी ‘OMG 2’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आणि त्यावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिसाद मिळू लागला. या चित्रपटाला अजूनही काही जणांकडून विरोध केला जात आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यातील काही सीन्सवर तीव्र आक्षेप घेतला आहे. अशातच आता अध्यात्मिक गुरू सदगुरू यांनी ‘ओह माय गॉड 2’च्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अक्षयसाठी खास पोस्ट लिहिली.
सदगुरू यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्विट करत आपला अनुभव सांगितला. त्यांनी एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये ते अक्षयसोबत डिस्क खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नमस्कार अक्षय कुमार, तुम्हाला इथे ईशा योग केंद्रात भेटून आणि ‘ओह माय गॉड 2’बद्दल जाणून घेऊन खूप आनंद झाला. जर आपल्याला असा समाज घडवायचा असेल जो महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या सन्मानासाठी संवेदनशील असेल तर तरुणांना त्यांच्या शारीरिक गरजा कशा हाताळायच्या याबद्दल शिक्षित करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली शिक्षण प्रणाली निव्वळ माहितीवर आधारित न राहता तरुणांना त्यांचं शरीर, मन आणि भावना कशा हाताळाव्यात यासाठी सुसज्ज करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.’
Namaskaram @SadhguruJV? Was an absolute honour to visit the Isha Yoga Center. I had one of the best experiences ever. Thank you for watching OMG 2 and for your insightful, kind feedback. Means so much to me and my entire team that you liked and blessed our effort. https://t.co/du99U8ybK9
— Akshay Kumar (@akshaykumar) August 7, 2023
सदगुरूंच्या ट्विटवर अक्षय कुमारनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईशा योग केंद्राला भेट देणं हा माझ्यासाठी एक विशेष सन्मान होता. हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक होता. ‘ओह माय गॉड 2′ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले आणि तुम्ही आशीर्वाद दिला ही माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी खूप मोठी गोष्ट आहे’, अशा शब्दांत त्याने आभार मानले.
2012 मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. यामध्ये अक्षयसोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. त्याचसोबत चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचेही आदेश दिले आहेत.