मोठी बातमी! अभिनेता रितेश देशमुख याची मालकी असलेल्या कंपनीचे चौकशी आदेश
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांची मालकी असलेल्या कंपनीचे राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
लातूर : लातूर शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांची मालकी असलेल्या कंपनीचे राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अतुल सावेंनी चौकशीचे आदेश दिल्याचं पत्र लातूर भाजपकडून जारी करण्यात आलंय.
अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मे.देश अँग्रो या कंपनीला एमआयडीसीने नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप केला आणि तसेच त्यांच्या कंपनीला जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे कर्ज वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. संबंधित आरोपांची दखल घेत सहकार मंत्री अतुल सावे यांनी चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मे. देश अँग्रो या रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला नियम डावलून भूखंड आणि जिल्हा बँकेने कोट्यवधीचे कर्ज दिल्याचा आरोप लातूर भाजपचे पदाधिकारी अॅड. प्रदीप मोरे यांनी केला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रदीप मोरे यांनी निवेदनाद्वारे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार अतुल सावे यांनी सहकार विभागाला लातूर जिल्हा बँकेने मे. देश अॅग्रो कंपनीला दिलेल्या कर्जाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नियमबाह्य 62 एकर 17 गुंठे जागा वाटप, 120 कोटींचे बेकायदेशीरपणे कर्ज, प्रदीप मोरे यांचे पत्राद्वारे गंभीर आरोप
भाजपचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रदिप मोरे आणि भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांना पत्राद्वारे याबाबत मागणी केली होती. या पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. एमआयडीसीने रितेश देशमुख यांच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने जागा वाटप केली आणि बँकेकडून त्यांना बेकायदेशीरपणे 120 कोटींचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
भाजप पदाधिकाऱ्याने अतुल सावेंना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“मे. देश अँग्रो प्रा. लि. ही कंपनी 23 मार्च 2021 रोजी स्थापन झाली होती. त्यानंतर कंपनीने लगेच 5 एप्रिल 2021 रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये सॉलव्हट प्लॉटसाठी जागा मागणीचा अर्ज केला होता. त्यानंतर लगेच 9 एप्रिल 2021 ला मुंबईत संबंधित अर्जाविषयी बैठक होऊन कंपनीसल तब्बल 2,52,726 चौ. मि. म्हणजेच 62 एकर 17 गुंठे जागा देण्यात आली.”
“विशेष म्हणजे कंपनीने हा भूखंड प्राधान्य या सदराखाली मिळवला आणि याच सदराखाली 2019 पासून 16 जणांचे भुखंड मागणीचे प्रस्ताव एमआयडीसीकडे प्रलंबित होते. या सर्व प्रस्तावांना बाजूला सारुन मे. देश अँग्रो प्रा. लि. या कंपनीस 62.17 एकर जागा देण्यात आली.”
“संबंधित कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 5 सप्टेंबर 2021 रोजी 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. तसेच पंढरपूर अर्बन बँकेने 4 ऑक्टोबर 2021 रोजी 4 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. या एकूण 65 कोटींच्या कर्जासाठी कंपनीने केवळ एमआयडीसीकडून मिळवलेला भुखंड गहाण ठेवला. त्यानंतर पुन्हा या कंपनीस लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 55 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आणि यासाठी देखील कंपनीने त्यांना मिळालेला एमआयडीसीचा तोच भूखंड गहाण ठेवला. अशाप्रकारे एकूण 120 कोटींचं कर्ज कंपनीने मिळवले आहे.”
“सदर कंपनी ही सिनेअभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मालकीची आहे. त्यांचे बंधू अमित देशमुख आणि धिरज देशमुख आमदार आहे. यापैकी अमित देशमुख हे महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्री होते. तर धिरज देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. या सर्व नातेसंबंधांमुळे मे. देश अँग्रो प्रा. लि. या खासगी कंपनीस शासनाचे आणि बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून भुखंड आणि कर्जवाटप झालेले आहे.”