मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने सीताहरणबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद उफाळल्यानंतर त्याने आपलं विधान मागे घेतले आहे. “कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागतो आणि माझं विधान मागे घेतो”, असं सैफ अली खान म्हणाला आहे. ‘व्हारल भयानी’ने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर सैफचं स्पष्टीकरण शेअर केलं आहे (Saif Ali Khan apologised for his statement).
“माझ्या एका मुलाखतीदरम्यान एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, याची मला जाणीव झाली आहे. माझा तसा हेतू कधीच नव्हता किंवा तसा अर्थ नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागू इच्छितो, मी माझं विधान मागे घेतो”, असं सैफ म्हणाला.
“प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी नेहमीच नीतीवान आणि शौर्याचे प्रतीक राहिले आहेत. आदिपुरुष म्हणजे वाईट गोष्टींवर मिळालेल्या विजयाचा उत्सव साजरा करणे. कोणतीही विकृती न करता महाकाव्य सादर करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र काम करत आहे”, असंदेखील सैफने सांगितलं (Saif Ali Khan apologised for his statement).
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सैफ अली खान 2022 साली प्रदर्शित होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारीत आहे. दरम्यान, ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सीताहरण संबंधित केलेल्या टिप्पणीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.
सैफने सीताहरणबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर प्रचंड भडका उडाला. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी देखील इशारा दिला. या सर्व घडामोडीनंतर सैफने आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. ‘व्हायरल भयानी’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफची भूमिका शेअर केली आहे. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असं सैफ म्हणाला आहे.
सैफ वादग्रस्त वक्तव्य काय?
“एका राक्षस राजाची भूमिका साकारणं हे खूप उत्साहिक आहे. मात्र ही भूमिका तितकी क्रूर नाही. आम्ही या भूमिकेला भरपूर मनोरंजनात्मक पद्धतीने बनवणार आहोत. सीतेचं अपहरण आणि रामासोबत झालेलं युद्ध हे सूड घेण्याच्या ईष्येने झालं असल्याचं आम्ही दाखवणार आहोत. लक्ष्मनने रावणाची बहिण सुपर्नकाचं नाक कापलं होतं. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि रामासोबत युद्ध झालं, असं आम्ही दाखवणार आहोत”, असं वक्तव्य सैफ अली खानने केलं आहे (Saif Ali Khan statement on Sitaharan).
रामायणावर आधारित आदिपुरुष चित्रपट
‘आदिपुरुष’ हा चित्रपट 2022 साली 15 ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. ओम राऊतने याआधी ‘तानाजी- द अनसंग वॉरीअर’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सैफ अली खानने खलनायकची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही सैफ खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आदिपुरुष चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर कृती सेनन सीता देवीची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा बजेट 400 कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल.
संबंधित बातमी : ‘सीताहरणवर’ रावण vs भाजपा! सैफवर का भडका?