मुंबई: अभिनेता सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या बहुचर्चित चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात निर्मात्यांना खूप मोठा फटका बसला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने सतत फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्याने मुख्य कलाकार भरमसाठ फी घेतल्याचंही म्हणून दाखवलं.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “बिग बजेट चित्रपटाच्या कमाईचे आकडे कमी दिसणं खूप निराशाजनक असतं. विक्रम वेधासारखा चित्रपट चांगली कमाई का करू शकला नाही, याचं माझ्यासमोर मोठं कोडं आहे. विक्रम वेधा या चित्रपटाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही.”
“सध्या प्रेक्षकांना काय आवडतं आणि काय नाही हेच कोणाला कळत नाही. काही कलाकार एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. ही रक्कम खरीच खूप मोठी असते. आपण भलीमोठी रक्कम कलाकाराला फी म्हणून देतो, पण त्याबदल्यात चित्रपटाची कमाई तेवढी होत नाही”, असं तो पुढे म्हणाला.
फक्त 2 टक्के लोकसंख्याच तिकिटाचे पैसे भरून थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास जात असल्याचं त्याने सांगितलं. हेच 2 टक्के जर 20 टक्क्यांमध्ये बदललं, तर बॉलिवूड इंडस्ट्रीत भरभराट येऊ शकते, असं मत सैफने या मुलाखतीत व्यक्त केलं.
सैफ लवकरच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारतोय. चित्रपटातील सैफच्या लूकवरून मोठा वाद झाला होता. मात्र व्हीएफएक्सद्वारे हा लूक बदलण्यात येत असल्याचं कळतंय. आदिपुरुषमध्ये सैफसोबत प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.