चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर 6 जखमा; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 16, 2025 | 8:48 AM

अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफच्या घरात मध्यरात्री एका चोराने चाकूहल्ला केला असून त्यात अभिनेता जखमी झाला आहे.

चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर 6 जखमा; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या चोराचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टीम्स बनवले आहेत. सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.

“सैफवर चोराने चाकूहल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ दुखापत झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. आम्ही या प्रकरणी अधिक तपास करत आहोत. या घटनेप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचसुद्धा तपास करत आहे”, असं अधिकारी म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते, यासंदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत. यासाठी ते सैफच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत. हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. तर सैफवरील उपचारानंतर त्याचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. याप्रकरणी अद्याप सैफची पत्नी करीना कपूर किंवा इतर कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.