सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी; फेटाळली पोलिसांची मागणी
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे कोर्टात आज त्याला हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांची मागणी फेटाळली.
![सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी; फेटाळली पोलिसांची मागणी सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी; फेटाळली पोलिसांची मागणी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Saif-Ali-Khan-Attack-Shariful-Islam-Shahajad.jpg?w=1280)
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम याला आज (बुधवारी) वांद्रे न्यायालयात हजर केलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी गरज पडल्यास आरोपीच्या कोठडीच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती न्यायालयाने पोलिसांना दिली. पोलिसांनी शरीफुलकडून एक शस्त्रही जप्त केलं असून ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. “आरोपी अत्यंत हुशार आहे. गुन्हा करण्याआधी त्याने रेकी केली होती”, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. काही महिन्यांपूर्वी शरीफुल कोलकात्यात राहत होता, त्यामुळे पोलिसांचं एक पथक कोलकात्याला चौकशीसाठी गेलं आहे.
याविषयी न्यायदंडाधिकारी म्हणाले, “तपास पूर्ण झाला आहे. आता पोलीस कोठडीची गरज नाही. तपासात काही नवं समोर आल्यास बीएनएसएस कायद्यानुसार नंतर पोलीस कोठडीची मागणी करता येईल.” त्यामुळे सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली होती. तो बांगलादेशी असून भारतात त्याने अवैधरित्या प्रवेश केल्याचं, पोलिसांनी सांगितलं. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं असून त्याने भारतात नाव बदलून बिजॉय दास असं ठेवलं. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास आरोपीने सैफच्या 12 व्या मजल्यावरील घरात शिरून त्याच्यावर चाकूने सहा वार केले होते.
या प्रकरणी शरीफुलचे वकील संदिर शेरखाने म्हणाले, “कोणतंही नवीन कारण न दिल्याने वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली नाही. पुढे जर योग्य कारण दिलं तर पुन्हा कोठडी मिळू शकेल. एफआयआरमध्ये हेक्सा ब्लेडचा उल्लेख होता. मात्र पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. योग्य ती कारणं नव्हती, म्हणून पोलीस कोठडी देण्यात आली नाही. कोर्टाची परवानगी घेतली असून सत्र न्यायालयात आम्ही जामीन अर्ज करणार आहोत. पोलिसांच्या थिअरीमध्ये अनेक विरोधाभास आहेत.”
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Veer-Pahariya-with-mother.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-serial.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Saif-Ali-Khan-and-Kareena-Kapoor-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-7-1.jpg)
“आरोपीचा फोटो सँपल फेस रेकग्निशनसाठी (चेहरा ओळखण्यासाठी) पाठवण्यात आलं आहे. गुन्हा करण्यापूर्वी आरोपीने आधी रेकी तसंच तयारीदेखील केली होती. आरोपीने कौशल्यपूर्ण पद्धतीने गुन्हा केला. तो काही मध्यस्थींच्या माध्यमातून त्याच्या गावी पैसेसुद्धा पाठवत होता. त्याचा तपास करायचा आहे,” असा युक्तिवाद पोलिसांनी केला.