'आदिपुरुष' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अंतिम ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधील अभिनेता सैफ अली खानच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे. सैफने या चित्रपटात लंकेशची भूमिका साकारली आहे. आदिपुरुषची कथा रामायणावर आधारित आहे.
ट्रेलरमधील सैफचा लूक, त्याचं अभिनय आणि एकंदर त्याचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे. लंकेशच्या भूमिकेतील त्याच्या भारदस्त आवाजानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
'आदिपुरुष'च्या टीझरमधील सैफ अली खानच्या लूकवरून प्रचंड ट्रोलिंग झाली होती. त्यानंतर निर्मात्यांनी कलाकारांच्या लूकमध्ये काही बदल केले. सैफच्या लूकमध्येही काही बदल केल्याचं या ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय.
प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आदिपुरुषमधील सर्व कलाकार उपस्थित होते. मात्र सैफ यामध्ये कुठेच दिसला नाही. त्यामुळे त्याच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात संभ्रम होता. आता अंतिम ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या 16 जून रोजी पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सैफ अली खानसोबतच प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत.