‘सैराट’ या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे लवकरच ‘झुंड’ (Jhund) हा बॉलिवूड चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नागराज यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले असताना ‘झुंड’ हा नागराज यांनी मराठीत का केला नाही, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले. आता खुद्द त्यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘झुंड मराठीत का केला नाही’, असा प्रश्न विचारणाऱ्यांना नागराज मंजुळेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “मी म्हणतो पुष्पा मराठीत का झाला नाही”, असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
काय म्हणाले नागराज मंजुळे?
“मी म्हणतो ‘पुष्पा’ मराठीत का झाला नाही, किंवा तो तेलुगूतच का बघितला जातोय, हिंदीतच का बघितला जातोय? फेसबुकवर मी पाहतो की, अशा बऱ्याच चर्चा होत असतात. पण सोशल मीडियावर सेन्सीबल गोष्टींवर चर्चा होत नाही. मला गंमत वाटते की मराठीत केला पाहिजे म्हणतात. पण मग बच्चन साहेबांनी पण मराठीत चित्रपट केला पाहिजे ना. त्यांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट केला पाहिजे इतका रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा असला पाहिजे. तेवढा वेळसुद्धा देता आला पाहिजे. निर्मात्यांनीही तेवढे पैसे दिले पाहिजेत की बच्चनसाहेब मराठीत चित्रपट करतील,” असं ते म्हणाले.
मराठीत चित्रपट का केला नाही याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “कोणाचं पारडं जड आहे, ते इथे महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट ही बरी आहे की मी हिंदी चित्रपट केला आणि त्यात बच्चनसाहेब आहेत. उद्या असं व्हावं की परत बच्चन साहेबांना घेऊन मराठीत चित्रपट करता यावं. उगाच बसल्या बसल्या असं बोलणं खूप सोपं आहे. घरी बरून फेसबुकवर प्रश्न विचारणं खूप सोपं आहे. पण काही करायचं म्हटलं तर ही काही एका माणसाची गोष्ट नाही. प्रयत्न करता करता त्याला यश मिळू शकेल. हिंदीला नेहमी वरचढ पाहिलं जातं, पण अजय-अतुल यांचं उदाहरण द्यायचं झाल्यास, त्यांची कुठलीही गाणी भारी वाटतात. पण मराठी गाणी आहेत, म्हणून आपला अभिमान आहे आणि योगायोग आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठीतच नाही तर जगातले भारी राजे आहेत. आपला योगायोग हा आहे की त्यांची जी भाषा आहे, त्या भाषेत आपला जन्म झाला आहे.”
‘झुंड’ हा चित्रपट येत्या ४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.
संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!
संबंधित बातम्या: झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी