Salman Khan : सलमानला लगेच माफी मिळणार नाही, बिश्नोई समाजात माफ करण्याची प्रथा कशी आहे?
Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या जीवाला धोका आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 1998 साली सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती, तो राग लॉरेन्सनला आहे. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी अशी त्याची मागणी आहे. पण सलमानने अशी माफी मागितली, तर त्याला लगेच माफी मिळणार का? जाणून घ्या.
“सलमान खानने आमच्या मंदिरात येऊन, समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून माफी मागावी” असं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मागच्यावर्षी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखीतत म्हटलं होतं. त्यावेळी लॉरेन्स पंजाबच्या भतिंडा तुरुंगात बंद होता. आता वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबादारी स्वीकारली आहे. सलमान खानसोबत असलेले चांगले संबंध, हे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे एक कारण असल्याच बोललं जातय. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी असं एका भाजपा नेत्याने म्हटलं आहे. राजस्थानात 1998 साली ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. काळवीटाला बिश्नोई समाजात पवित्र मानलं जातं. या घटनेनंतर बिश्नोई समाजात एकच संतापाची लाट उसळली होती.
गुरु जंभेश्वर यांनी 16 व्या शतकात बिश्नोई पंथाची स्थापना केली. बिश्नोई समाजाचे गुरु जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. त्याच आधारावर बिश्नोई समाजाची स्थापना झाली. लॉरेन्स बिश्नोईच्या पूर्वजांनी सुद्धा गुरु जंभेश्वर यांची दीक्षा घेतली. हे सर्व नियम मानण्याचा संकल्प केला. लॉरेन्स बिश्नोई याच्या मते, सलमान खानने गुन्हा केला असून त्याने माफी मागितली पाहिजे.
माफी मागण्यासाठी कुठे यायचं?
“बिश्नोई समाजाची काही तत्त्वं आहेत, त्यानुसार एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली पाहिजे. त्याने प्रायश्चित घेतलं पाहिजे” असं अखिल भारतीय बिश्नोई समाजाचे सचिव हनुमान राम बिश्नोई म्हणाले. माफी मिळावी यासाठी त्या व्यक्तीने राजस्थान बिकानेर येथील मुक्ती धाम मुकाम मंदिरात आलं पाहिजे. बिश्नोई समाजासाठी हे पवित्र स्थळ आहे.
त्याने म्हटलं पाहिजे, की…
“सलमान खानने निसर्गातील दोन सुंदर जीव घेतले. एखादा माणूस गुन्हा करतो, तेव्हा त्याला मनातून प्रायश्चित घेण्याची भावना निर्माण झाली पाहिजे” असं हनुमान राम इंडिया टुडेवर म्हणाले. “मुक्ती धाम मुकाम येथे माफी मागायला येणाऱ्याने समाजाची सुद्धा माफी मागितलीच पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे, माझ्या हातून गुन्हा घडला आहे, बिश्नोई समाज मला माफ करा” असं बिश्नोई समाजाच्या नेत्याने सांगितलं.
बिश्नोई समाज किती मोठा आहे?
“ठरलेल्या प्रथेनुसार माफी मागितल्यानंतर त्याला माफ करायचं की, नाही हे पूर्णपणे समाजावर अवलंबून असतं. बिश्नोई समाज त्या व्यक्तीला माफ करण्याबद्दल विचार करेल. काय करायचं? हा निर्णय पूर्णपणे समाजावर अवलंबून आहे. जगभरात बिश्नोई समाजाचे 70 लाख लोक आहेत” असं या नेत्याने सांगितलं. हनुमान राम यांच्या मते, सलमान खान जो पर्यंत माफी मागत नाही, तो पर्यंत तो शिक्षेस पात्र आहे. बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई हे सुद्धा तेच म्हणाले. “सलमान खानकडून माफीचा प्रस्ताव आला, तर तो आम्ही समाजासमोर मांडू”