“या धक्क्यातून सावरण्यासाठी..”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर अरबाज खानची प्रतिक्रिया
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "बाबा सिद्दिकी यांच्याशी आमचे खूप जवळचे संबंध होते. त्यांच्या हत्येनं आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे", असं तो म्हणाला.
राष्ट्रवादी काँग्रसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे. 12 ऑक्टोबर रोजी सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. इतकंच नव्हे तर ‘जो सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याला आपला हिशोब तयार ठेवावा लागेल’ अशी धमकी बिष्णोई गँगकडून देण्यात आली होती. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री होती. या घटनेबाबत आणि सलमानच्या सुरक्षेबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
अरबाज म्हणाला, “बाबा सिद्दिकी हे खूप जवळचे फॅमिली फ्रेंड होते. माणूस म्हणूनही ते आम्हाला खूप प्रिय होते. तुम्ही पाहिलं असेल दरवर्षी ईदच्या निमित्त संपूर्ण इंडस्ट्री त्यांच्या इफ्तार पार्टीत उपस्थित असायची. त्यामुळे आज ते नसतानाचं खूप दु:ख होत आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करत आहोत. या घटनेनं आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”
याआधी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला होता, “आम्ही ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्याच्या घडीला कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. अर्थातच प्रत्येकजण चिंतेत आहे. सध्या आम्ही सर्वजण पूर्ण ठीक आहोत, असं मी म्हणू शकत नाही. पण याक्षणी जे योग्य असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. गोष्टी ज्यापद्धतीने झाल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही सरकार आणि पोलिसांसोबत मिळून सहकार्य करत आहोत. सलमान सुरक्षित राहावा यासाठी काळजी घेत आहोत. प्रत्येकजण खूप प्रयत्न करत आहे. सध्या आम्हाला असंच राहावं लागेल.”
View this post on Instagram
एप्रिल महिन्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या दोन शार्पशूटर्सनी सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार केला होता. याआधी बिष्णोई गँगकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचं अरबाज खानने स्पष्ट केलंय. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी आणि खान कुटुंबीयांचं खूप खास नातं होतं. दरवर्षी ईदनिमित्त सिद्दिकी यांच्याकडून भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जायचं. या इफ्तार पार्टीला खान कुटुंबातील सदस्य आवर्जून उपस्थित राहायचे. इतकंच नव्हे तर शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद मिटवण्यात सिद्दिकी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघांना इफ्तार पार्टीला बोलावून सिद्दिकी यांनी वाद मिटवला होता.