“दोन्ही पूर्व पत्नी शिव्या देतील..”; आमिर खानच्या मुलाने सलमानसमोर असं का म्हटलं?
अभिनेता आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान हे दोघं 'बिग बॉस 18'च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. यावेळी जुनैदने आमिरबद्दल सलमानला असं काही सांगितलं, जे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तब्बल 105 दिवसांनंतर रविवारी ‘बिग बॉस 18’ची सांगता झाली. सलमान खानने ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन केलं. तर या एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून अभिनेता आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री खुशी कपूर पोहोचले होते. ‘बिग बॉस 18’ ग्रँड फिनालेच्या मंचावर आमिर आणि सलमानने खूप धमाल केली. या दोघांच्या मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी आमिरच्या मुलाने एक मजेशीर खेळ आयोजित केला. आमिर आणि सलमान यांना एकमेकांचे मोबाइल फोन बदलून एकमेकांच्या फोनमधील मेसेज तपासायला सांगितले. यानंतर जी गंमत झाली, ती पाहण्यासारखी होती.
सुरुवातीला सलमानने त्याचा फोन आमिरच्या हातात देण्यास नकार दिला. “मला हा खेळ खेळायचा नाही”, असं तो म्हणाला. त्यावर आमिरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सलमान मस्करीत त्याला म्हणतो, “सोड.. तुझं सगळं व्यवस्थित आहे. तू दोन वेळा लग्न केलंस, तुला मुलंबाळं आहेत. माझ्या आयुष्यात यापैकी काहीच नाहीये.” या गमतीशीर संवादानंतर अखेर सलमान त्याचा फोन आमिरच्या हातात देतो आणि त्याचा फोन स्वत:च्या हातात घेतो. आमिरचा फोन तपासताना सलमान त्याला म्हणतो, “तुझी कोणी नवीन गर्लफ्रेंड आहे का?” त्यावर आमिर सांगतो की, “माझा फोन बघ, मग तुला उत्तर मिळेल.”




View this post on Instagram
आमिर आणि सलमान एकमेकांचा फोन बघून मस्करी करत असतानाच जुनैदच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकतो. आमिरचा फोन हातात घेऊन सलमान म्हणतो, “मला तुझ्या फोनमध्ये काय दिसणार आहे? एकतर रिना किंवा किरणच तुला मेसेज करतील.” हे ऐकून आमिरचा मुलगा जुनैद म्हणतो, “मग दोन-दोन पूर्व पत्नींच्या शिव्या तुम्हाला वाचायला मिळतील.” यावर सर्वजण हसू लागतात.
आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. जुनैद आणि आयरा ही रिना-आमिरची मुलं आहेत. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. आमिर आणि किरण यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला.