बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानकडून नातेवाईकांना ‘ही’ खास विनंती
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांकडून जवळच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात आलं आहे. सलमानच्या सुरक्षेखातर हे खास आवाहन करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री सलमानने लिलावती रुग्णालयात सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. जो सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा, अशी खुली धमकीच बिष्णोईकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचं सलमानशी कनेक्शन असल्याने पोलिसांनी त्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवली आहे. याआधी लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानलाही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. घराबाहेरील सुरक्षा वाढवल्यानंतर आता सलमानने त्याच्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना एक खास विनंती केली आहे.
बाबा सिद्दिकी आणि सलमान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं होतं. सलमानसाठी सिद्दिकी हे फक्त मित्रच नाही तर कुटुंबीयांसारखे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येच्या वृत्ताने सलमानला मोठा धक्का बसला आहे. नुकतंच जेव्हा सिद्दिकी यांचे पुत्र झीशान सिद्दिकी हे सलमानला भेटायला त्याच्या घरी गेले, तेव्हा त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत झालं होतं. सिद्दिकी यांच्या हत्येबद्दल समजताच सलमान त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचला होता. सलमानच्या सुरक्षेखातर आता त्याच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना आवाहन केलंय की त्यांनी पुढील काही दिवस भेटायला येऊ नये.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यापासून सलमान खूप अस्वस्थ आहे. तो सतत फोनवरून अंत्यविधीची तयारी आणि प्रत्येक छोटी-मोठी माहिती जाणून घेत आहे. इतकंच नव्हे तर त्याने पुढील काही दिवसांसाठी त्याच्या काही खासगी भेटीसुद्धा पुढे ढकलल्या आहेत. सलमानचे कुटुंबीयसुद्धा सिद्दिकी यांच्या निधनाने दु:खी आहेत. अरबाज आणि सोहैल खानसुद्धा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला आवर्जून जायचे.
सिद्दिकी हे आपल्या आमदार पुत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांपैकी दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी सिद्दिकी यांच्या छातीत लागल्याचं समजतंय. या गोळीबारात सिद्दिकी यांच्याबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.