‘सलमानच्या घरात घुसून त्याला बॉम्बने उडवू’; व्हॉट्स ॲप नंबरवर धमकी
सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर धमकी मिळाली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या घरात घुसून त्याला बॉम्बने उडवू असंही त्यात म्हटलंय. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाहतूक विभागाचा व्हॉट्स ॲप क्रमांक हा सार्वजनिक असल्याने त्यावर कोणालाही तक्रार करण्याची मुभा असते. त्यामुळे अनेकदा निनावी धमक्या या क्रमाकांवर येत असतात. सलमानला याआधीही अनेकदा अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे.
‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगरम्यान सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप आहे. तेव्हापासूनच तो बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. काळवीट हा बिष्णोई समुदायाचा अत्यंत प्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीच्या वृत्ताने त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय अत्यंत महागडी अशी बुलेटप्रूफ गाडीसुद्धा त्याने घेतली आहे.




नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानला या जीवे मारण्याच्या धमक्यांची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “भगवान, अल्लाह सब उनपर है, जितनी उमर लिखी है, उतनी लिखी है. बस यही है. कभी कभी इतने लोगों को साथ मै लेके चलना पडता है, बस वो ही प्रॉब्लेम हो जाती है (देव, अल्लाह सर्वकाही त्याच्यावर आहे. जेवढं वय जगायचं लिहिलंय, तेवढं लिहिलंय. फक्त हेच आहे की कधी कधी इतक्या लोकांना सोबत घेऊन राहावं लागतं, फक्त हीच एक समस्या आहे.)”