सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या बिष्णोई गँगच्या शूटरला अटक
नवी मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका शूटरला हरयाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. सुखा असं त्याचं नाव असून त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सुखा नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सुखाला हरयाणामधील पानिपत इथून अटक केल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नवी मुंबई पोलिसांनी हरयाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फरार आरोपीला अटक केली. त्याला नवी मुंबईत आणल्यानंतर आज (गुरुवार) कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. सुखा हा बिष्णोई गँगचा शूटर असल्याचं समजतंय. सलमानला त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसजवळ टारगेट करण्याचा आरोपीचा प्लॅन पोलिसांना जून महिन्यात समजला होता. त्याआधी एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगचा हात असल्याचा संशय सलमानने पोलिसांसमोर व्यक्त केला होता. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात जे चार्जशीट दाखल केलं होतं, त्यात सलमानच्या जबाबाचाही समावेश होता. सलमाने असंही म्हटलं होतं की जानेवारीमध्ये दोन अनोळखी लोकांनी बनावट ओळखपत्र दाखवून त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये शिरकाव करण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 मध्ये सलमानच्या वांद्रे इथल्या इमारतीबाहेर धमकीचं पत्र आढळून आलं होतं. तर मार्च 2023 मध्ये ई-मेलद्वारे सलमानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सलमान खानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नेहरा गँगने जवळपास 60 ते 70 लोकांना नेमण्यात आल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. सलमानच्या वांद्रे इथल्या घरावर, पनवेल फार्महाऊसवर आणि फिल्म सेट्सवर त्यांची नजर होती. याबाबत ठराविक माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात 24 एप्रिल रोजी काही जणांविरोधात केस दाखल करण्यात आली होती.
एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नव्हती. सलमानच्या घरातील बाल्कनीच्या भिंतीला गोळी लागली होती. या घटनेनंतर आणि आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.