एक्स गर्लफ्रेंडच्या पतीचं सलमानकडून खास कौतुक; नेटकऱ्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का!
अभिनेता सलमान खानने लिहिलेली ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टमध्ये सलमानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या पतीचं कौतुक केलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता सलमान खानचं खासगी आयुष्य म्हणजे जणू खुलं किताबच आहे. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लुलिया वंतूर अशा अनेक अभिनेत्रींची नावं सलमानसोबत जोडली गेली. यापैकी ऐश्वर्या आणि कतरिनासोबतच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. ऐश्वर्यासोबत सलमानचं नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपुष्टात आलं होतं. तर कतरिनानेही अभिनेता विकी कौशलशी लग्न केल्यानंतर सलमानसोबत फक्त कामापुरते संबंध ठेवले. आता सलमानने चक्क त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या पतीचं कौतुक केलं आहे. यासाठी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. सध्या सोशल मीडियावर सलमानच्या याच पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कतरिनाचा पती विकी कौशल आहे.
विकी कौशलचं ‘तौबा तौबा’ हे गाणं वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यातील त्याचा डान्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. विकीने या गाण्यावर इतक्या सहज आणि सुंदर पद्धतीने डान्स केला की सलमानसुद्धा त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. सलमानने विकीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘कमालीचे डान्स मूव्ह्स आहेत विकी. गाणं खूप सुंदर दिसतंय. तुला खूप साऱ्या शुभेच्छा!’ सलमानची ही पोस्ट पाहून विकीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानेसुद्धा सलमानचे आभार मानणारी एक पोस्ट लिहिली. ‘सो स्वीट ऑफ यू सलमान सर, खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी तुमचे कौतुकाचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत’, असं त्याने लिहिलं आहे.
गेल्या आठवडाभरापासून विकी कौशलचं ‘तौबा तौबा’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर विकीने केलेला डान्स पाहून प्रत्येकजण फिदा झाला आहे. फक्त सलमाननेच नाही तर हृतिक रोशननेही विकीचं कौतुक केलं आहे. हृतिकने विकीची डान्सिंग स्टाइल आवडल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देत विकीने लिहिलं, ‘आता माझं आयुष्य सफल झालं आहे.’ हे गाणं विकी आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटातील पुढची कहाणी दाखवली जाणार आहे.