आईवडिलांच्या लग्नात धर्म नव्हे तर ‘या’ गोष्टीचा होता मोठा अडथळा; सलमानकडून खुलासा

अभिनेता सलमान खानने एका पत्रकार परिषदेत त्याच्या आईवडिलांच्या लग्नाविषयी खुलासा केला. आई सलमा आणि वडील सलीम खान यांच्या लग्नाच्या वेळी हिंदू किंवा मुस्लीम असा धर्माचा अडथळा नव्हता, पण त्याऐवजी एक वेगळीच समस्या होती, असं सलमान म्हणाला.

आईवडिलांच्या लग्नात धर्म नव्हे तर या गोष्टीचा होता मोठा अडथळा; सलमानकडून खुलासा
सलमान खान, सलीम खान आणि सलमा खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 28, 2025 | 1:35 PM

अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत सलमान त्याच्या आईवडिलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमा खान यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. सलीम हे मुस्लीम आहेत तर सलमा या हिंदू आहेत. त्यांचं लग्नापूर्वीचं नाव सुशील चरक असं आहे. सलीम खान यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी सलमा खान असं नाव बदललं. त्यावेळी आईवडिलांच्या लग्नातील सर्वांत मोठा अडथळा हा धर्म नव्हता तर एक वेगळीच गोष्ट होती, असं सलमानने या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

लग्नापूर्वी सुशीला यांच्या कुटुंबीयांकडून सलीम यांच्याबद्दल काही समस्या होत्या. पण ती समस्या हिंदू-मुस्लीम या वेगवेगळ्या धर्मांमुळे नव्हती, तर सलीम खान यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमुळे होती. “हिंदी आणि मुस्लीम किंवा संस्कृतीतील बदल यांमुळे कधीच त्यांना समस्या नव्हती. परंतु त्याहीपेक्षा त्यांना सर्वांत मोठी काळजी या गोष्टीची होती की माझे वडील फिल्म इंडस्ट्रीत काम करतात”, असं सलमानने सांगितलं.

सलीम खान यांनी नोव्हेंबर 1964 मध्ये सुशीला यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी आपलं नाव सलमा असं बदललं. या दोघांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही चार मुलं आहेत. सलीम यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. सलमान आणि त्याचे कुटुंबीय मिळून सर्व सण उत्साहात साजरा करतात. दिवाळी असो, ईद असो किंवा गणेशोत्सव.. संपूर्ण खान कुटुंबीय एकत्र येऊन सण-उत्सवाचा आनंद लुटताच.

हेलन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सलीम खान हे मुलगा अरबाजच्या शोमध्येही व्यक्त झाले होते. “त्यावेळी ती तरुण होती, मीसुद्धा तरूण होतो. माझा काही चुकीचा उद्देश नव्हता. मी तिच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक प्रसंग होता, जे कोणासोबतही घडलं असतं,” असं ते म्हणाले होते. 1980 मध्ये सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम आणि हेलन यांनी लग्न केल्यानंतर अर्पिताला दत्तक घेतलं.