“लाज वाटली पाहिजे तुला..”; पॉडकास्टमध्ये मलायकाच्या मुलावर का भडकला सलमान खान?
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खानचा पॉडकास्ट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच या पॉडकास्टमध्ये अरहानचा काका आणि अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. या एपिसोडमध्ये सलमान त्याच्या पुतण्यावर एका गोष्टीवरून फटकारतो.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खानने त्याच्या करिअरसाठी अत्यंत वेगळा मार्ग निवडला. आधी त्याने ‘डंब बिर्याणी’ या नावाने पॉडकास्ट सुरू केला आणि त्यात विविध सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्याने आई मलायकासोबत मिळून वांद्रे परिसरात एक रेस्टॉरंट सुरू केलं. रेस्टॉरंटच्या कामामुळे अरहानचा पॉडकास्ट नियमितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येत नव्हता. मात्र आता थोड्या ब्रेकनंतर त्याच्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याचा काका सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. या एपिसोडमध्ये सलमानने अरहान आणि त्याच्या मित्रांसोबत विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारल्या आहेत. मात्र एका गोष्टीवरून त्याने पुतण्या अरहानला फटकारलंसुद्धा आहे.
सलमान का झाला नाराज?
अरहान खानचा हा पूर्ण पॉडकास्ट इंग्रजी भाषेत आहे. विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारताना सलमान अरहानला आणि त्याच्या मित्रांना सांगतो की, “तुम्ही हिंदीत बोलायला पाहिजे.” त्यावर अरहान हसत सांगतो की त्याच्या मित्रांना हिंदी बोलता येत नाही. अरहानचा एक मित्रसुद्धा म्हणतो, “आम्ही खूप वाईट हिंदी भाषा बोलतो.” हे ऐकून सलमान त्यांना सांगतो, “तुम्ही हिंदीत बोलण्याचा प्रयत्न तर करा. जर चुकलात तर मी सुधारेन.” काकाचं हे वक्तव्य ऐकून अरहानला हसायला येतं. “आता आम्हाला हिंदीचे धडे मिळत आहेत. आता तुम्हाला भाषेबद्दल काही समस्या असू शकतात”, असं तो उपरोधिकपणे म्हणतो.




View this post on Instagram
यावरूनच सलमान त्याला फटकारतो. तो पुतण्याला सुनावतो, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्हाला हिंदी बोलता येत नाही. तुम्ही हिंदी भाषिक प्रेक्षकांचा विचार करत नाही आहात. खरंतर तुम्ही हे सगळं फक्त स्वत:साठी करत आहात.” यापुढे सलमान त्याचे काही अनुभवसुद्धा अरहान आणि त्याच्या मित्रांना सांगतो. करिअरमधील आव्हानं आणि पर्याय यांबद्दलही तो त्यांना सल्ले देतो.
अरहानच्या या पॉडकास्टमध्ये याआधी त्याचे वडील अरबाज खान, काका सोहैल खान, आई मलायका अरोरा यांनीसुद्धा हजेरी लावली होती. अरहानने त्याच्या काही मित्रांसोबत मिळून या पॉडकास्टची सुरुवात केली. सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित खान कुटुंबातील सदस्य त्यात हजेरी लावत असल्याने आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विविध गप्पा-गोष्टी होत असल्याने, प्रेक्षकांकडून या पॉडकास्टला चांगला प्रतिसाद मिळत गेला.