बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान अस्वस्थ, उडाली झोप; झीशान यांच्याकडून खुलासा
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान प्रचंड अस्वस्थ झाला असून त्याची रात्रीची झोपसुद्धा उडाली आहे, असा खुलासा झीशान सिद्दिकी यांनी केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते सलमानबद्दल बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्यांचं कुटुंब सावरलेलं नाही. एकीकडे त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी हा वडिलांना गमावल्याचं दु:ख पचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा मोठा धक्का अभिनेता सलमान खानलाही बसला आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती. जो सलमान खान आणि दाऊद यांची मदत करेल, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा, अशी धमकीच बिष्णोई गँगकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे सलमानशी जवळीक असल्यानेच सिद्दिकी यांना आपले प्राण गमवावे लागल्याचं म्हटलं जातंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झीशान त्याच्या वडिलांच्या निधनाविषयी व्यक्त झाला.
सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान अस्वस्थ
“सलमान भाई त्या घटनेनंतर खूप निराश आहे. पिताजी आणि सलमान भाई हे जणू एकमेकांच्या भावासारखे होते. इतकं खास त्यांचं नातं होतं. वडिलांच्या निधनानंतर भाईने आमची खूप मदत केली. तो सतत माझी विचारपूस करतोय. त्याला रात्रीची झोप लागत नाही, असंही तो मला म्हणाला. त्याच्याकडून आम्हाला नेहमीच पाठिंबा मिळाला आणि यापुढेही मिळत राहील”, असं झीशान सिद्दिकी यांनी ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले बाबा सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. सिद्दिकी हे आपल्या आमदार पुत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांपैकी दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी सिद्दिकी यांच्या छातीत लागली. या गोळीबारात सिद्दिकी यांच्याबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली होती.