“सोभिता-नाग चैतन्यची जोडी…”; लग्नाबद्दल काय म्हणाली समंथा?
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने 4 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर त्याचं हे दुसरं लग्न आहे. आता नाग चैतन्य आणि सोभिताच्या लग्नाबाबत समंथाने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि नाग चैतन्य यांनी 4 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. यंदाच्या वर्षातील हा सर्वांत चर्चेत राहिलेला विवाहसोहळा ठरला आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने हे दुसरं लग्न केलंय. समंथा आणि नाग चैतन्य यांचा संसार फक्त चार वर्षेच टिकला होता. ही जोडी इंडस्ट्रीत खूप चर्चेत होती. आता दुसऱ्या लग्नानंतरही नाग चैतन्यच्या आयुष्यातून ‘समंथा’ मात्र अद्याप गेली नाही, असंच म्हणावं लागेल. सोभिताशी लग्नानंतर नाग चैतन्यच्या आयुष्यात असलेली समंथा ही त्याची पूर्व पत्नी समंथा रुथ प्रभू नसून सोभिताची बहीण समंथा धुलिपाला आहे. सोभिता आणि नाग चैतन्यच्या लग्नादरम्यान समंथाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता लग्नानंतर तिने त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.
समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बहिणीच्या लग्नातील काही खास क्षण पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने बहिणीविषयी प्रेम व्यक्त केलंय. बहिणीचं लग्न हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता, असं ती म्हणाली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. तुला खूप प्रेम अक्का. तुझ्या आयुष्यातील लोकांवर तू किती प्रेम करतेस आणि त्यांच्यासाठी किती काय करतेस हे फक्त मला माहीत आहे. मला माहित असलेली सर्वांत प्रतिष्ठित जोडी.. अक्का आणि चै (नाग चैतन्य).’
View this post on Instagram
समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य सोभिताला डेट करू लागला होता. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या लंच आणि डिनर डेटचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. मात्र दोघांनीही रिलेशनशिपबद्दल कधीच जाहीर प्रतिक्रिया दिली नव्हती. लग्नाआधी काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांचा साखरपुडा झाला, तेव्हा दोघांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत नातं जाहीर केलं होतं.
नाग चैतन्यने 2017 मध्ये समंथाशी लग्न केलं होतं. गोव्यात अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचे मार्ग वेगळे झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मुलाच्या दुसऱ्या लग्नाविषयी नागार्जुन म्हणाले होते, “नाग चैतन्यला पुन्हा त्याचा आनंद मिळाला. तो खूप खुश आहे आणि त्याला पाहून मीसुद्धा खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत विभक्त झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता.”