Samantha: ..अन् सर्वांसमोर समंथाच्या डोळ्यात आले अश्रू; म्हणाली “आयुष्यात कितीही समस्यांना सामोरं गेले तरी..”
आधी घटस्फोट, नंतर आजारपण.. ट्रेलर लाँचदरम्यान स्टेजवरच समंथाला कोसळलं रडू
हैदराबाद: अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मायोसिटीस या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती चाहत्यांना दिली. समंथाने परदेशात या आजारावर उपचारदेखील घेतले. मात्र अद्याप ती पूर्णपणे बरी झाली नाही. आजारपणातही समंथाने तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी स्टेजवर बोलताना समंथाला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक गुणाशेखर समंथाचं कौतुक करत होते, तेव्हा ती भावूक झाली. नंतर समंथा तिच्या संघर्षाविषयी आणि चित्रपटांवरील प्रेमाविषयी व्यक्त झाली. “माझ्या आयुष्यात मी कितीही संघर्षाचा सामना केला तरी एक गोष्ट कधीच बदलणार नाही. इतकं प्रेम मी चित्रपटांवर आणि चित्रपट माझ्यावर करतं. शाकुंतलम या चित्रपटानिमित्त हे प्रेम आणखी घट्ट होईल असा मला विश्वास आहे”, असं समंथा म्हणाली.
We’re with you sam ?? be strong@Samanthaprabhu2#SamanthaRuthPrabhupic.twitter.com/sDjC9r9dBR
— Jegan Sam ♡ (@JeganSammu) January 9, 2023
समंथाच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहते तिला पाठिंबा देत आहेत. ‘या संघर्षात आम्ही तुझ्यासोबत आहोत’ असं एका युजरने म्हटलंय. तर ‘तू खंबीर राहा’ असं दुसऱ्याने लिहिलंय.
शाकुंतलम या चित्रपटात समंथा शकुंतलाची भूमिका साकारतेय. शकुंतला ही मेनका आणि विश्वमित्रा यांची कन्या असते. या चित्रपटात मोहन बाबू, प्रकाश राज, अदिती बालन, गौतमी, अनन्या नागल्ला, कबीर दुहन सिंह यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू आऱ्हा या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. येत्या 17 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मायोसिटीस म्हणजे काय?
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.