Samantha | समंथाने करिअरबद्दल घेतला मोठा निर्णय; निर्मात्यांचे पैसेही केले परत, चाहत्यांना धक्का!
प्रतिक्रिया देताना समंथाने लिहिलं होतं, ‘मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्यासारखं अनेक महिने उपचार आणि औषधांचा त्रास सहन करावं लागू नये आणि तुमचं तेज वाढवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला प्रेम’.
हैदराबाद : आधी घटस्फोट आणि त्यानंतर ‘मायोसिटीस’ या आजाराचं निदान.. यांमुळे अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. उपचारानंतर जेव्हा जेव्हा ती माध्यमांसमोर किंवा कॅमेरासमोर आली, तेव्हा हा परिणाम तिच्या चेहऱ्यावर अनेकदा पहायला मिळाला. याच आजारामुळे आता तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचं समजतंय.
परत केले निर्मात्यांचे पैसे
या वर्षभरातील काळात समंथा कोणताच तेलुगू किंवा बॉलिवूड चित्रपट स्वीकारणार नाही. त्याऐवजी आपलं संपूर्ण लक्ष ती आरोग्यावर देणार आहे. मायोसिटीस या आजारावर ती पुढील उपचार घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे निर्मात्यांकडून घेतलेली अॅडव्हान्स रक्कम तिने परत केली आहे. सध्या ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं हे शेवटचं शेड्युल असून येत्या दोन ते तीन दिवसांत तेसुद्धा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे तिने ‘सिटाडेल’ या सीरिजचंही शूटिंग पूर्ण केलं आहे.
मायोसिटिस म्हणजे काय?
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंना वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ किंवा वेदना. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.
View this post on Instagram
‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा समंथा माध्यमांसमोर आली, तेव्हा आजारपणामुळे समंथाच्या चेहऱ्यावरील तेज हरपलंय, अशी कमेंट एका चाहत्याने केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना समंथाने लिहिलं होतं, ‘मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्यासारखं अनेक महिने उपचार आणि औषधांचा त्रास सहन करावं लागू नये आणि तुमचं तेज वाढवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला प्रेम’.
आणखी एका पोस्टमध्ये समंथाने तिच्याबद्दलच्या वृत्तांचा समाचार घेतला होता. “मला ही बाब स्पष्ट करायची आहे की अनेक वृत्तांमध्ये माझी प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मी हे सांगू इच्छिते की माझ्या जिवाला कोणताही धोका नाही. मी अद्याप मेली नाही. अशा हेडलाइन्स गरज असेल असं मला वाटत नाही”, असं तिने लिहिलं होतं.