दिव्यांग व्यक्तींवर कमेंट करणं रैनाला पडलं भारी, सुप्रीम कोर्टाने उचललं कठोर पाऊल
हास्यकलाकार समय रैना गेल्या काही दिवसापासून वादात अडकला आहे. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये केलेलं भाष्य त्याला महागात पडणार असंच दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी दखल घेतली असून दिव्यांगता आणि आजारपणाबाबत केलेला विनोद समय रैनाला अडचणीत आणणार आहे.

हास्य कलाकार समय रैनाचा पाय आणखी खोलात गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून वादाशी त्याची गट्टी जमल्याचं दिसत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये पालकांबाबत केलेल्या वादग्रस्त विनोदानंतर समय रैना, रणवीर इलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा आधीच अडचणीत आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असं असताना समय रैनाच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. कारण सुप्रीम कोर्टाने दिव्यांगता आणि त्यांच्या आजारपणाबाबत केलेल्या विनोदाबादत नाराजी व्यक्त केलीआहे. तसेच त्याला प्रतिवादी करण्याचा आदेश दिला आहे. क्योर एसएएम फाउंडेशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने त्याच्या विनोदाप्रती नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. संस्थेने समय रैनाने दिव्यांगाबाबत केलेले विनोद कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी कोर्टाने कठोर पवित्रा घेतला आहे. समय रैनाची क्लिप कोर्टाच्या रेकॉर्डवर घेतली आहे. यात अंध आणि दोन महिन्यांचा मुलाची थट्टा उडवली होती. त्या मुलाला उपचारासाठी 16 कोटी रुपयांची आवश्यकता होती.
या प्रकरणानंतर समय रैनाच्या पाठी आणखी एका वादाचा ससेमिरा लागला आहे. आधीच पालकांवर केलेल्या वादग्रस्त विनोदामुळे आसाम आणि महाराष्ट्रात खटला सुरु आहे. आता आणखी नव्या प्रकरणाला सामोरं जावं लागणार आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती कांत यांनी सुनावणी दरम्यान काय म्हंटलं याबाबत लाईव्ह लॉने लिहिलं की, ‘हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटते. तुम्ही या घटनांची नोंद घ्यावी अशी आमची इच्छा आहे. जर तुमच्याकडे ट्रान्सक्रिप्टसह व्हिडिओ-क्लिपिंग असतील तर त्या आणा. संबंधित व्यक्तींना सहभागी करून घ्या. तुम्हाला वाटणारे काही उपायही सुचवा. मग आपण पाहू.”
रणवीर इलाहाबादिया याचिकेवर 28 एप्रिलला सुनावणी
रणवीर इलाहाबादिया याच्या खटल्यावर न्यायालयाने तारीख दिली आहे. रणवीरने पासपोर्ट रिलीज करण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्ट पुढच्या सोमवारी सुनावणी करणार आहे. 28 एप्रिलला याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. पालकांबाबत केलेल्या विनोदाबाबत आधीच समय रैना, रणवीर इलाहाबादिया,अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. इतकंच काय तर वाद इतका टोकाला गेला की, समय रैनाना युट्यूबवरून सर्वच वादग्रस्त कंटेंट डिलिट करावा लागला.