हिरोइनपेक्षा हिरो दमदार; ‘थोडं तुझं आणि थोड माझं’ मालिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
अभिनेत्री शिवानी सुर्वे ही तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आता एका लोकप्रिय अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘गोठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे लवकरच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत तो तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तेजस प्रभू हा स्वातंत्र्य सूर्य या वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू यांचा नातू. स्वातंत्र्यसेनानींचा वारसा लाभलेल्या आपल्या घराण्याचा तेजसला प्रचंड अभिमान आहे. प्रभूंचा पारंपरिक वाडा जपण्यासाठी तेजसची धडपड सुरु आहे. मात्र त्याच्या वहिनीला तेजसला हरवून प्रभू निवासाचा ताबा मिळवायचा आहे. प्रभू कुटुंबाची शान समजली जाणारी ही वास्तू तेजस वाचवू शकेल का? यात त्याला कुणाची साथ मिळणार? हे मालिकेतून उलगडेल.
स्टार प्रवाह वाहिनीच्या या नव्या मालिकेत काम करण्यासाठी समीर प्रचंड उत्सुक आहे. तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, “तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट मला खूपच भावली. कोणतंही नातं एकतर्फी असून चालत नाही. थोडं तुझं आणि थोडं माझं करतच नातं टिकवावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वगोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. शिवानी सुर्वेसोबत मी पहिल्यांदा काम करतोय. काम करताना खूप मजा येतेय.”
View this post on Instagram
देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे या मालिकेतून नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जात नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी मालिका येत्या 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.