“जर पुन्हा संधी मिळाली तर..”; आर्यन खानच्या अटकेबाबत काय म्हणाले समीर वानखेडे?
कॉर्डेलिया क्रूझमधील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई झाली होती. आता वानखेडेंनी त्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यनने त्यावेळी 25 दिवस तुरुंगात घालवले होते, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. नंतर त्याच्याविरोधात ठोस पुराव्यांअभावी कोर्टाने त्याला निर्दोष ठरवलं. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन खानविरोधातील तपासाचं नेतृत्व केलं होतं आणि याप्रकरणात आर्यनला अटक केली होती. त्यावेळी शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील व्हॉट्स ॲप चॅट्ससुद्धा लीक झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वानखेडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
“पुन्हा संधी मिळाली तर..”
NEWJ ला दिलेल्या मुलाखतीत समीर यांना विचारण्यात आलं की सुपरस्टारच्या मुलाला अटक केल्यामुळे तुम्हाला मीडियाकडून टारगेट करण्यात आलं होतं का? त्यावर उत्तर देताना वानखेडे म्हणाले, “मी असं म्हणणार नाही की मला टारगेट केलं गेलं. उलट मी म्हणेन की मी खूप नशिबवान आहे कारण मला मध्यमवर्गीय लोकांकडून भरपूर प्रेम मिळालं, जे इतके नशिबवान नाहीत. कधी कधी विचार करतो की जे झालं ते ठीकच झालं कारण मला लोकांकडून इतकं प्रेम मिळालं. त्यांना ही गोष्ट जाणवली की कोणी कितीही मोठा का असेना, सर्वांसाठी नियम समान असावेत. मला या गोष्टीचा कोणताच पश्चात्ताप नाही. जर मला पुन्हा अशी संधी मिळाली तर मी पुन्हा हेच करेन.”
“शाहरुखसोबतचे चॅट्स लीक केले नाहीत”
समीर वानखेडे यांना जेव्हा शाहरुखच्या चॅटबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आधी त्यांनी त्यावर उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की ते यावर बोलू शकत नाहीत, कारण कोर्टात त्यांनी एक ॲफिडेविट दिलं आहे, ज्यामुळे ते केसबद्दल बोलू शकत नाहीत. याचसोबत समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं की शाहरुखचे चॅट्स त्यांनी लीक केले नव्हते. ते म्हणाले, “मी इतका कमकुवत नाही की चॅट्स लीक करेन.” जेव्हा वानखेडे यांना विचारलं की चॅट्स जाणूनबुजून लीक करण्यात आले होते का, जेणेकरून शाहरुख आणि आर्यन यांना लोकांची सहानुभूती मिळावी? त्यावर वानखेडे इतकंच म्हणाले की, “मी त्यांना आणखी प्रयत्न करण्याचा सल्ला देईन.”
लाच घेतल्याच्या आरोपावर उत्तर
आर्यनची सुटका करण्यासाठी त्यांनी 25 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वानखेडे यांनी दावे फेटाळून लावले. “मी त्याला कधीच सोडलं नाही, खरंतर मीच त्याला पकडलंय. ही केस कोर्टात आहे आणि मला आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, असं ते पुढे म्हणाले. मीडियाने आर्यन खानला लहान मुलासारखं चित्रित केल्याने एनसीबीच्या टीमने त्याचा छळ केला, असेही आरोप वानखेडेंवर करण्यात आले होते. या आरोपांना नाकारत त्यांनी स्पष्ट केलं, “मला वाटत नाही की मी एखाद्या लहान मुलाला अटक केली. वयाच्या 23 व्या वर्षी भगतसिंग यांनी देशासाठी प्राण दिले होते. तुम्ही त्याला (आर्यन) लहान मुलगा म्हणू शकत नाही.”