नाशिक : 4 जानेवारी 2024 | क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा प्रीमियर नाशिकमध्ये पार पडला. या प्रीमियर शोसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी चित्रपटाचे निर्माते, विविध कलाकार सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह पदाधिकारी आणि बहुसंख्येने नागरिकदेखील उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “महात्मा फुले यांचा जीवनपट अतिशय उत्तम प्रमाणे सत्यशोधक चित्रपटात मांडणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांचं कार्य बघता एका चित्रपटात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले जाऊ शकत नाही. तर प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील.”
“कुठल्याही धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांचा लढा नव्हता. त्यांचं लढा ब्राम्हणांच्या विरुद्ध नव्हे तर ब्राम्हण्य वादाच्या विरोधात होता. जो पर्यंत आपण आपला हा इतिहास माहिती होत नाही तो पर्यंत आपल्याला समाज सुधारकांचे विचार आपल्याला तळागाळात पोहोचवता येणार नाही. त्यासाठी सत्यशोधक चित्रपट हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्र भरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा,” असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
सत्यशोधक या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे ही सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 5 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.