‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’मधील अजय गोगावले यांच्या आवाजातील हृदयस्पर्शी गाणं
महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलन आणि उपोषणांमध्ये अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील आघाडीवर आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. येत्या 26 एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘उधळीन जीव…’ या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. याशिवाय अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका ‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे साकारणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरली आहे. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती.