मॅन ऑफ द इअर 2022 (Man Of The Year 2022) ही पुरुषांची व्यक्तिमत्व स्पर्धा नुकतीच इंडोनेशियातील (Indonesia) बाली याठिकाणी पार पडली. या स्पर्धेमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मॅन ऑफ द इयर इंडिया 2022 या स्पर्धेत आशिष शिंदेनं (Ashish Shinde) भारताचं प्रतिनिधित्व केलं. आशिष हा मूळचा सांगलीचा असून तो पुण्यात राहतो. आशिषने मॅन ऑफ द इयर आशिया 2022 हा किताब पटकावला आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या आठ फेऱ्या झाल्या. पर्सनल इंटरव्ह्यू, नॅशनल कॉस्च्युम, कॅज्युअल वेअर, स्विम वेअर, टॅलेंट राऊंड अशा विविध फेऱ्यांमध्ये बाजी मारणाऱ्या आशिषची निवड बेस्ट फाईव्हमध्ये झाली. त्यानंतर भारतातून आलेल्या मतांवरून आणि या फेऱ्यांमध्ये झालेल्या परीक्षणावरून आशिषने मॅन ऑफ इयर एशिया 2022 हा किताब जिंकला.
आशिष हा रॉयल फेस ऑफ इंडियाचाही विजेचा आहे. त्याचबरोबर रॉयल महाराष्ट्रची स्पर्धाही त्याने जिंकली आहे. या विविध स्पर्धांमध्ये बाजी मारणाऱ्या आशिषला विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. काही जाहिराती आणि त्याचबरोबर काही मालिकांच्याही ऑफर त्याला मिळाल्या आहेत. आशिषचे वडील हे निवृत्त आर्मी ऑफिसर असून आशिषला मॉडेलिंग क्षेत्रामध्ये ते पूर्णतः साथ देतात.
या सर्व स्पर्धांसाठी ग्लोबल मॉडेल इंडियाचे सर्वेसर्वा असणारे अमर सोनावणे यांचं मोलाचं मार्गदर्शन आशिषला मिळालं. गुरु मयुरेश अभ्यंकर आणि पूर्ण भारतातले आप्तस्वकीय यांच्या आशीर्वादाने हा बहुमान भारताला मिळाल्याचा आनंद आशिषने व्यक्त केला.