माझी भाची म्हणून नाही तर..; अखेर ‘आलमजेब’च्या निवडीबद्दल भन्साळींनी सोडलं मौन
'हिरामंडी' प्रदर्शित झाल्यानंतर शार्मिनवर बरीच टीका झाली. या टीकेला वैतागून तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील कमेंट सेक्शन बंद केलं होतं. इतकंच नव्हे तर 'हिरामंडी'मधील अभिनेत्यानेही शार्मिनच्या अभिनयावर टीका केली होती. कार्ट राइटची भूमिका साकारलेल्या जेसन शाहने शार्मिनचं अभिनय एकाच लयात असल्याचं म्हटलं होतं.
संजय लीला भन्साळी यांनी ‘हिरामंडी: द डायमंड’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. यामध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शार्मिन सेहगल, अध्ययन सुमन, फरदीन खान, शेखर सुमन यांसह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. एकीकडे यातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत असताना आलमजेबची भूमिका साकारलेल्या शार्मिनवर मात्र जोरदार टीका होतेय. शार्मिन ही भन्साळींची भाची आहे. केवळ नातेसंबंधामुळे भन्साळींनी तिला ‘हिरामंडी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका दिली, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यावर आता भन्साळींनी अखेर मौन सोडलं आहे. शार्मिनने बरेच राऊंड्स ऑडिशन्स दिले आणि त्यानंतर तिची निवड झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भन्साळींनी सांगितलं की,” शार्मिन ही माझी भाची आहे म्हणून मी तिला भूमिका दिली नव्हती. तर आलमजेबच्या भूमिकेसाठी तिचा चेहरा परफेक्ट होता. एक अशी भोळी तरुणी जिला तवायफ बनायचं नव्हतं. ती तवायफसारखी बोलत नाही, त्यांच्यासारखी चालत नाही. तिच्या चेहऱ्यावर एक अशी निरागसता असते, जी तिच्या आजूबाजूला असलेल्या इतर तरुणींच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. आलमजेबच्या भूमिकेसाठी एक फ्रेश आणि निर्दोष वाटणारा चेहरा हवा होता. त्यामुळे शार्मिन त्या भूमिकेसाठी योग्य होती असं मला वाटलं. ती माझी भाची आहे, म्हणून मी तिला घेतलं नाही.”
View this post on Instagram
याविषयी ते पुढे म्हणाले, “इतरांप्रमाणेच तिलासुद्धा त्या सर्व परीक्षांमधून जावं लागलं होतं. असंख्य चाचण्या झाल्या, ऑडिशन्स झाले. या चाचण्यांची काही गणतीच नव्हती. मी स्वत: तिची परीक्षा घेतली आणि त्यानंतरच तिला भूमिका देण्याचा निर्णय घेतला. मी तिला सांगितलं होतं की तुलासुद्धा या सर्व परीक्षांमधून जावं लागेल. कारण अशा विश्वास तू कधीच काम केलं नाहीस. तुझ्यासोबत असलेल्या इतर अभिनेत्रींनी बरीच वर्षे इंडस्ट्रीत काम केलंय. त्यांनी अशा भूमिका साकारल्या आहेत.”
या देशातील स्टार सिस्टीम उधळून लावली पाहिजे, असंही मत भन्साळींनी या मुलाखतीत मांडलं. भन्साळींनी याआधी ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, हृतिक रोशन, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सलमान खान यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केलंय. मात्र त्यांच्याकडे आधी कलाकार म्हणूनच पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. “जर तुम्हाला कास्टिंग चांगली भेटली, तर अर्ध युद्ध तुम्ही तिथेच जिंकता. लोक म्हणतात की तुम्हाला मोठ्या स्टार्सची गरज नाही का? मी म्हणतो, नाही. हे लोक खूप चांगले अभिनेते आहेत आणि मला अभिनेत्यांची गरज आहे. माझ्या मते आपण स्टार सिस्टीम काढून टाकली पाहिजे”, असं ते म्हणाले.