पहिल्या भागात आनंद दिघे यांचं महानिर्वाण दाखवल्यानंतर आता..; ‘धर्मवीर 2’बद्दल काय म्हणाले संजय राऊत?
‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्यावरही राऊतांची टीका केली.
गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा पहिला भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपल्या खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहेत, भंपक आहेत,” असं ते थेट म्हणाले. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅगलाइन या दुसऱ्या भागाला देण्यात आली आहे. त्यावरही राऊतांनी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“सन्माननीय आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखतो. जे आज आमच्या आनंद दिघे साहेबांवर स्वत:ची मालकी असल्यासारखं बोलत आहेत, सिनेमे काढत आहेत, नाटकं काढतायत.. पण आनंद दिघेंजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल. आज गुरूपौर्णिमा आहे, बाळासाहेबांनी सांगितलंय की सत्य बोला आणि ईमानानं जगा. जर बेईमान लोकं आनंद दिघे यांना गुरू मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या टॅगलाइवर ते पुढे म्हणाले, “आनंद दिघेंच्या तोडीं काही वाक्ये घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न कराल. पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं सुरू आहे. आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. ते काय वेगळं हिंदुत्व नव्हतं ना? आनंद दिघेंनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व स्वीकारलं होतं. आम्ही सर्वांनीही तेच स्वीकारलंय. ठाण्यात, टेंभीनाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमच्या सर्वांचं हिंदुत्व वेगळं.. असं काही झालं नाही. वेगळ्या चुलीच्या ज्या हिंदुत्व मांडल्या गेल्या आहेत, त्या कधीच आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाहीत.”
‘धर्मवीर 2’चा ट्रेलर
“हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहेत, भंपक आहेत. आपल्या खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ असेल, ‘द ताश्कंद फाइल्स’ असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले आहेत. अवडंबर माजवण्यासाठी, आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी त्यांनी सिनेमा या माध्यमाचा वापर केला. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या माहितीनुसार पहिल्या चित्रपटात आनंद दिघे साहेबांचं महानिर्वाण दाखवलंय. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो. पण विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, आपल्या बेईमानीवर थोडे तारे चमकवायचे आहेत, जे खोटं आहे त्याला उजाळा द्यायचा आहे.. म्हणून आनंद दिघे साहेबांसारख्या निष्ठावान शिवसेना नेत्याचा वापर करायचा, असं सगळं सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.