‘धर्मवीर 2’वरून संजय राऊतांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले..
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यांच्यावर गोलमाल 1,2,3.. हे चित्रपट काढायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आज (27 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवं प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही ते म्हणाले. “धर्मवीरांची व्याप्ती काय होती, हे आम्हाला माहीत आहे. ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना माहीत नाही. आनंद दिघे काय होते, हे आम्हाला माहीत आहे. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्याही वर नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण बाळासाहेब ठाकरेंचे या महाराष्ट्रात पसरलेले जे लाखो लोक आहेत, समर्थक आहेत, कोट्यवधी.. ते एकनाथ शिंदेंना मानत नाहीत. त्यामुळे अशा चित्रपटाच्या माध्यमातून एक नवं प्रतिक निर्माण करायचा हा प्रयत्न आहे,” असं राऊत म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले, “आनंद दिघे हे शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते सतत पुढे असायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंदेपेंक्षा राजन विचारे किंवा इतर अनेक असे लोक होते, जे दिघे साहेबांच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरावर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखं जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वत:चा डंका पिटवण्याची वेळ आली नसती.”
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीरच्या पहिल्या भागात त्यांचा मृत्यू दाखवला आहे. मग आता धर्मवीर 2,3,4 काढतायत. ते काय अमर, अकबर, अँथनी सिनेमा काढतायत का? खरंतर गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असे चित्रपट यांच्यावर काढले पाहिजेत. आम्ही स्वत: आता सिनेमा काढतोय. फडणवीस धर्मवीर 3 काढतायत. त्यांना काय हो धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला जे नवीन औरंगजेब, अफजल खान येतायत, दिल्ली आणि गुजरातवरून.. त्यांनी त्यांच्यावरून सिनेमा काढला तर नक्कीच त्याची चर्चा होईल,” अशी उपरोधिक टीका राऊतांनी केली आहे.